कोपरगाव दि. ३० जुन २०२३ :
श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी संजीवनी उद्योग समूहास भेट दिल्याबद्दल त्यांचा शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे थोरात गटाचे १९ पैकी १८ संचालक निवडून आले त्यानंतर अध्यक्षपदी सुधीर लहारे, तर उपाध्यक्षपदी विजय दंडवते यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर प्रथमच या दोघांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी भेट देऊन अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्याकडून साखर कारखानदारी आणि भविष्यातील नियोजन याबाबत मार्गदर्शन घेतले.
प्रारंभी अमृत शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
बिपिनदादा कोल्हे याप्रसंगी म्हणाले की, राहाता परिसराची कामधेनू गणेश कारखाना असून बंद पडलेल्या साखर कारखानदारीचे पुनर्जीवन कसे करावे याबाबत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी राज्याला दिशा देत सर्वप्रथम गणेश कोल्हे पॅटर्नचा अवलंब करत साखर कारखानदारी सुरू करून त्या भागातील अर्थकारण सुरळीत करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आज राज्यात सहकारी साखर कारखानदारीत स्पर्धा निर्माण झाली आहे. त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी, त्याचप्रमाणे गणेश परिसरात सभासद शेतकऱ्यांची उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवू. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शन आपल्याला सातत्याने मिळाले आहे. त्याचा गणेश परिसरातील सभासद शेतकऱ्यांना अधिकाधीक उपयोग करू. सर्व नवनिर्वाचित संचालकांच्या अभिनंदन. या निवडणुकीत ज्या ज्ञात अज्ञात सभासद शेतकऱ्यांनी विजयासाठी प्रयत्न केले त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे., याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, संदीप लहारे आदी उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.