देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील भाऊसाहेब गोलवड यांना दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांचे सही केलेले पत्र देऊन शेत जमिनीचे कागदपत्र घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे हजर राहण्याचे सांगण्यात आले. सदर पत्र हे खोटे असल्याचे समजल्यावर भाऊसाहेब गोलवड यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली.राञी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
राहुरी तालूक्यातील माहेगाव येथील भाऊसाहेब देवराव गोलवड यांच्या शेत जमीनीचा वाद राहुरी येथील तहसील कार्यालयात सुरू होता. त्यानंतर तो वाद राहुरी येथील न्यायालयात सुरू आहे. भाऊसाहेब गोलवड यांना दिनांक ६ जुलै रोजी उमेश ज्ञानेश्वर गोसावी राहणार मालुंजा बुद्रुक याने समक्ष भेटून एक पत्र दिले. त्या पत्रावर जिल्हाधिकारी यांची सही होती. त्या पत्रात लिहिले होते कि, सन २०१२ पासून ते आजपर्यंत शेतीच्या वादातील सर्व कागदपत्रे घेऊन दिनांक ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहावे.
भाऊसाहेब घोलवड यांनी सदर पत्र त्यांचे वकील सुरज बिहाणी यांना दाखविले आणि त्या पत्राची शहानिशा केली. मात्र सदर पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही करून ते पत्र भाऊसाहेब बोलवड यांना देण्यात आले. असा संशय आला. त्यावेळी भाऊसाहेब गोलवड तसेच ॲड. सुरज बिहाणी यांनी संबंधित उमेश ज्ञानेश्वर गोसावी याला फोन करून सदर पत्रा बाबत विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की, सदर पत्र माझ्या फॅक्स नंबरवर आले होते. आणि ते मी गोलवड यांना दिले आहे. भाऊसाहेब घोलवड यांना मिळालेले पत्र हे खोटे असल्याचा त्यांना संशय आल्याने त्यांनी उमेश ज्ञानेश्वर गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सदर प्रकार हा अतिशय गंभीर असून जिल्हाधिकारी यांची खोटी सही करण्यात आली. यापूर्वी उमेश गोसावी यांनी जिल्हाधिकारी यांच्या खोट्या सह्या करून आणखी कोणा कोणाची फसवणूक केली. याबाबत राहुरी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत राहुरी पोलीसां कडून कोणता गुन्हा दाखल करणार. तसेच संबंधित उमेश गोसावी याच्यावर काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.