डाऊच बुद्रुक ते पुणतांबा आषाढी दिंडीचे चांदेकसारेत स्वागत
कोपरगाव (वार्ताहर) : काम क्रोध लोभ या विकारावर जो मात करतो तो खरा वारकरी. मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नसून तो आयुष्यात कसा झाला याला महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सोळा वर्षे जगले मात्र त्यांनी अवघ्या जगाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. आजही त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सात लाख भाविक सहभागी होतात. पायी वारीची सातशे वर्षा पूर्वीची परंपरा असून वारीत सहभागी झालेल्या भाविकांना मनाला आनंद मिळतो असे प्रतिपादन भागवताचार्य दिंडी चालक मनसुख महाराज दहे यांनी केले.
ते काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे ग्रामस्थांच्या वतीने झालेल्या दिंडी सोहळ्याच्या स्वागता प्रसंगी बोलत होते.डाऊच बुद्रुक ते पुणतांबा पायी दिंडी व पालखीची पूजन काळे कारखान्याचे माजी संचालक डॉ. गोरक्षनाथ रोकडे व पोलीस पाटील सौ मीराताई रोकडे यांनी सपत्नीक केले.
यावेळी काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सदस्य रोहिदास होन, काशिनाथ होन, सरपंच किरण होन, प्रा. विठ्ठल होन,जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक जयद्रथ होन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कल्याण होन, मोहन होन अर्जुन होन, विजय खरात ,रवींद्र खरात, बाळासाहेब गुरसळ, वाशिम शेख, जयवंत पवार, कांतीलाल महाराज दहे, धर्मा दहे, मनोहर होन अदी उपस्थित होते. यावेळी प्रा.विठ्ठल होन यांनी सांगितले की वारकरी पायी दिंडी हरिनामाच्या गजरात जात असते मनसुख महाराज दहे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणतांबा येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने चांगदेव महाराजांना भेटण्यासाठी वारकरी तल्लीन झालेले आहेत हरिनामाच्या गाजरात खूप मोठी ताकद आहे असे त्यांनी सांगितले. तर डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांनी वारकऱ्यांचे स्वागत करत पूर्वीपासून चालत असलेली परंपरा आजही दुसऱ्या पिढीत चांदेकसारे ग्रामस्थ पायी दिंडी व वारकरी यांचा गौरव करण्यास पुढे येत असल्याचे सांगत उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. दिंडी मधील वारकऱ्यांना अल्प उपहार व चहा नाश्त्याचे वाटप करण्यात आले.