16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांचा अवधी सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
आमदार अपात्रतेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. त्यादरम्यानं न्यायालयानं नार्वेकरांना नोटीस बजावली आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. यामध्ये शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
हा निकाल ठराविक वेळेत देणं गरजेचं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात येत होतं. पण या निकालासाठी अध्यक्ष कितीही वेळ घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे.