बांबू लागवड अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम

0

सातारा, दि.14  : जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत बांबू लागवड अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बांबू लागवड अभियान मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी वर्मा यांनी या सूचना केल्या.

            यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजय यादव, राजेंद्र शहा, संजीव कर्पे यांच्यासह महसूल, जिल्हा परिषद, वन व कृषि विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे सांगून श्री. वर्मा म्हणाले, बांबू पिकाचा समावेश आता गवत वर्गीय वनस्पतीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता बांबूची तोडणी ही करता येते व ते जाळताही येतात. तसेच नवीन धोरणानुसार आता औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये किमान 60 टक्के जैविक इंधनाचा वापर बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये बांबूची मागणी वाढणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना याचे फायदे समजावून सांगण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

    वर्मा पुढे म्हणाले, पर्यावरणामध्ये कार्बनचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी जैविक इंधनाचा वापर ही काळाची गरज आहे. त्यासाठी जैविक इंधनाची उपलब्धताही तितकीच महत्वाची आहे. बांबू हे जैविक इंधन म्हणून महत्वाची वनस्पती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवून त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच बांबूपासून मिळणारे उत्पन्न हे ऊसाच्या उत्पन्नाप्रमाणेच आहे. त्याला पाणीही कमी लागते. त्यामुळे पाण्याची बचत होण्यासही मदत होणार आहे. याशिवाय फक्त जाळण्यासाठी नाही तर बांबूचा वापर अगरबत्ती, फर्निचर या उद्योगांमध्येही होतो. हे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी एकत्र काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            सुरुवातीला जिल्ह्यातील नदी काठच्या शेतांमध्ये बांबू लागवड करावी असे सांगून शेतकरी नेते श्री. पटेल म्हणाले, बांबूचे बेट तयार होते. त्याला तंतूमुळ असते त्यामुळे जमिनीची धूप थांबवण्यास त्याचा फयदा होतो. कोयना धरणाच्या बुडित क्षेत्राच्या बाजूने बांबूची लागवड केल्यास धरणामध्ये येणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी बांबू लागवड हा एक चांगला पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.

            प्रत्येक गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांना किमान 20 एकर बांबू लागवडीचे उद्दीष्ट देण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, बांबू लागवडीची जिल्ह्यात सुरुवात झाली असून येत्या वर्षभरात त्याविषयीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल. या उद्दीष्टीविषयी दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावेळी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती यादव यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात बांबू लागवडीविषयी सुरू असलेल्या कामांविषयी माहिती सादर करताना जिल्ह्याला 27 हजार 500 हेक्टर बांबू लागवडीचे उद्दीष्ट असून त्यामध्ये जिल्हा परिषद – 10 हजार, वन विभाग व सामाजिक वनीकरण – 10 हजार आणि कृषि विभागास 7 हजार 500 हेक्टर या प्रमाणे उद्दीष्ट असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात सध्या 16 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर काम सुरू असल्याची माहिती दिली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here