मुंबई : राज्यातील १३ महापुरूषांच्या गावातील शाळांकरीता १४ कोटी ३० रुपये खर्च करून आधुनिकीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या नावांचा समावेश करताना .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कोल्हापुर जिल्ह्यातील कुंभोज या गावातील शाळेला वगळल्याने शिक्षण क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे. कर्मवीरांनी ज्या शाळेतून शिक्षणाचे धडे गिरवले ,ज्या व्यक्तीने गरीबांच्या शिक्षणाची दारं खुलं केली.त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुमार विद्या मंदिराचा विकास करण्याऐवजी राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने राज्य राज्य सरकार कर्मवीरांना महापुरुष मनात नाही काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या त्यांच्या आजोळी गावी झाला. याच कुंभोज गावातील ब्रिटिशकालीन शाळा असलेल्या कुमार विद्या मंदिर या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्या गावातील शाळेतील रजिस्टरमध्ये याची नोंद मोडीलिपीमध्ये आहे. कोल्हापुरातील मोडीलिपी तज्ज्ञ वसंत सिंघन यांनी सांगितलं की शाळेतील नावांच्या यादीत वरुन दुसऱ्या क्रमांकावर भाऊ पायगोंडा पाटील ऐतवडेकर असं त्यांच्या नावाची नोंद आहे.
भाऊराव पाटलांची या शाळेत घातल्याची तारीख ही ९ जून १८९८ अशी आहे. तर त्यांनी दुसरीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ही शाळा सोडली. त्यांचे शाळेतून नाव काढल्याची तारीख ही ९ जानेवारी १८९९ अशी आहे. त्यानंतर भाऊराव पाटील यांनी दहिवडी , विटा या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. सन १९०२ ते १९०९ या कालावधीत भाऊराव पाटील हे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूर येथे होते. शाहू महाराजांनी सुरू केलेल्या जैन बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी राजाराम हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं.