आगडगांव देवस्थानने केला खरपुडे, मकर यांचा सत्कार
नगर – कुठलेही ध्येय सहजासहजी साध्य होत नसते. त्यासाठी मनाची तयारी करुन जिद्द बाळगून कठोर परिश्रम केले तरच ध्येय साध्य होते. यश हे कष्टावर अवलंबून असते. नगरच्या खेळाडूंनी भारताचे नाव परदेशात उंचावले ही अभिमानाची बाब आहे. कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेतील या खेळाडूंच्या जिद्दीला, कठोर परिश्रमाला श्रद्धेची जोड असल्याने या स्पर्धेत धावणार्या योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय, विलास भोजने चांच्या मागे यश धावत आले, असे प्रतिपादन अध्यक्ष बलभिम कराळे यांनी केले.
नगर तालुक्यातील श्रीक्षेत्र आगडगाव येथे काळ भैरवनाथ मंदिरास दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन स्पर्धा पुर्ण करुन आल्यानंतर दर्शन घेतले. यावेळी आगडगांव देवस्थानच्यावतीने अध्यक्ष बलभिम कराळे यांच्या हस्ते योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय, विलास भोजने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त नितीन कराळे, अहमदनगर रनर्स क्लबचे अमृत पितळे, संजय शेळके, नागेश धसाळ आदि उपस्थित होते.
कराळे म्हणाले हे चारही खेळाडू आगडगांव येथे नियमित दर्शनासाठी येत असतात. त्यांचे मंदिरासाठी कायम योगदान राहिले आहे. काळ भैरवनाथांवर त्यांची श्रद्धा आहे. परदेशात जाऊन कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या स्पर्धेत सहभागी होऊन ती पूर्ण करणे म्हणजे यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत तयारी केली होती. जिद्दीला श्रद्धेची जोड त्यांना होती, त्यामुळे ते यशस्वी झाले, याचा आम्हाला अभिमान आहे.
सत्कारास उत्तर देतांना योगेश खरपुडे म्हणाले, खेळात यश-अपयश असते, पण देवावर श्रद्धा, भक्ती पण असायली हवी. आमची श्री भैरवनाथांवर नितांत भक्ती – विश्वास आहे. आमच्या यशामागे नक्कीच काळभैवनाथ यांचा आर्शिवाद आहे, त्यामुळेच मोठे यश मिळाले, असे ते म्हणाले. शेवटी अहमदनगर रनर्स क्लबने देवस्थानच्या सर्व विश्वस्तांचे आभार मानले.