कऱ्हाड : समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? त्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे. संभाजी भिडे यांनी कायदा मोडला आहे की नाही, तेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
तसे न केल्यास आम्ही तपास केला. ती व्यक्ती संत आहे. त्यांनी काही कायदा मोडलेला नाही, असे सांगून त्यांच्या पाया पडा, अन्यथा कायदा मोडल्याचे मान्य करत थेट कारवाई करा, असे आव्हानही माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री फडणवीस यांना दिले. आमदार चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झाला ते स्वागतार्ह आहे. मात्र, त्यांच्यावर काय कारवाई होणार, तेही सरकारने सांगितले पाहिजे. त्यावर कारवाई न करता मोकळे सोडले, तर आणखीन कुठे कुठे जाऊन पेटवले जाईल. भिडे यांना त्यांचा विचार पसरवत मनुस्मृतीसह चातुर्वर्णाबाबत बोलायचे असल्यास जरूर बोलावे. आम्ही त्याला विचाराने उत्तर देऊ.
मात्र, आमच्या नेत्यांबद्दल घाणेरडे वक्तव्य करीत आहेत, ते चुकीचे आहे. त्यावर गृहमंत्री काय कारवाई करणार आहेत, हेही स्पष्ट झाले पाहिजे. भाजपशी याचा काही संबंध नाही, असे गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘आरएसएसच्या अनेक संघटना आहेत. त्या वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. भाजपच्या अनेक हिंदुत्ववादी संघटना गुप्त पद्धतीने काम करतात. मनोहर कुलकर्णींसह अशा काही संघटनांना पैसे कोण देते, त्या संघटना कोण चालवते, या खोलात मला जायचे नाही. मात्र, जो कोणी कायदा मोडत असेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी साधी मागणी आहे. कायदा मोडला आहे, की नाही तेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पाहिजे. मात्र, भाजप सोयीप्रमाणे म्हणते. त्या संघटनांबाबत भूमिका घेत असते, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं
महाराष्ट्र सुरक्षित आहे. जनता बचाव करण्यासाठी सक्षम आहे. मात्र, मुद्दाम कोणीतरी तेलात काडी टाकत असेल, तर आपण गप्प बसायचे का? तरुण मुलांची डोकी भडकविणाऱ्या भिडे यांनी त्यांचे नाव का बदलले. एखाद्या विशिष्ट समाजाला आकर्षित करण्यासाठी नाव बदलून त्यांनी फसवणूक चालवली आहे, तीही सहन केली जाणार नाही.-पृथ्वीराज चव्हाण, आमदार