चांदेकसारे येथे ‘साईबाबा अॅग्रीकल्चरल प्रोड्युस प्रायव्हेट मार्केट’ चे प. पू. रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते थाटात उदघाटन
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे नव्याने सुरू झालेल्या ‘साईबाबा अॅग्रीकल्चरल प्रोड्युस प्रायव्हेट मार्केट’ मुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल,या नव्याने सुरू झालेल्या समितीच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या व या खाजगी बाजार समितीच्या संचालकांनी ‘शेतकरी हिताय, शेतकरी सुखाय’ हा मूलमंत्र जपत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांची काळजी घ्यावी त्यामुळे या परिसरातील शेतकरी देखील प्राधान्य देतील असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी साईबाबा अॅग्रीकल्चरल प्रोड्युस प्रायव्हेट मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे सुनील भाऊसाहेब गोंदकर, अखिलेश अशोक समदडिया, योगेश दत्तात्रय मोरे व सुजय बाळासाहेब जगताप या तरुणांनी मिळून सुरू केलेल्या ‘साईबाबा अॅग्रीकल्चरल प्रोड्युस प्रायव्हेट मार्केट’ या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उदघाटन सोमवारी (७ ऑगस्ट) राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकभैय्या कोल्हे हे बोलत होते.
सुनील गोंदकर, अखिलेश समदडिया, योगेश मोरे व सुजय जगताप यांनी सुरू केलेल्या या खाजगी बाजार समितीला शुभेच्छा देऊन कोल्हे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या चौघांनी मोठे धाडस करून श्री भैरवनाथ मंदिर परिसरात ही खाजगी बाजार समिती सुरू केली ही आनंदाची बाब आहे. श्री भैरवनाथांच्या आशीर्वादाने या व्यवसायात त्यांना निश्चितच यश मिळेल आणि त्यांची भरभराट होईल यात शंका नाही. शेतकऱ्यांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे. त्यामुळे व्यवसाय म्हणून नव्हे तर सेवा म्हणून काम करा. वजन काटा दोषमुक्त व अद्ययावत राहील याची काळजी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला द्या, चांगल्या सुविधा द्या, त्यामुळे शेतकरी आनंदाने आपला शेतमाल या ठिकाणी विक्रीसाठी आणतील. नव्याने चालू झालेल्या ‘साईबाबा अॅग्रीकल्चरल प्रोड्युस प्रायव्हेट मार्केट’ मुळे चांदेकसारे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची सोय झाली असून, आता शेतकऱ्यांना आपला शेतमाल दूरवर विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी लागणारा वेळ, वाहतूक खर्च वाचणार आहे. या खाजगी बाजार समितीमुळे या भागातील परिसरातील अर्थकारणाला व विकासाला चालना मिळणार आहे. या बाजार समितीच्या संचालकांनी शेतकऱ्यांचे हित व आर्थिक विकासाला प्राधान्य द्यावे, शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करावे असे मत विवेकभैय्या कोल्हे यांनी केली.
या कार्यक्रमास आ. आशुतोष काळे, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. विद्यासागर शिंदे, महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाचे संभाजी पाटील, कोपरगावचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) नामदेवराव ठोंबळ, सहाय्यक निबंधक रहाणे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुणराव येवले, संचालक बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, सतीश आव्हाड, केशवराव होन, रावसाहेब होन, माजी संचालक रामदास चिने, सोमनाथ होन, गोंदकर, समदडिया, मोरे व जगताप कुटुंबीय, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी प. पू. रमेशगिरीजी महाराज यांचे संतपूजन करून आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाचे आयोजक सुनील गोंदकर, अखिलेश समदडिया, योगेश मोरे व सुजय जगताप यांनी प. पू. रमेशगिरीजी महाराज, विवेकभैय्या कोल्हे व अन्य मान्यवरांचा सत्कार केला.