ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पंतप्रधानपदावर येऊन फक्त 45 दिवस झाले होते.
त्यांची नवी कर प्रणाली वादात सापडल्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सहन करावा लागला होता.
त्यांनी सत्तेत येताच नवी कर प्रणाली आणत करांमध्ये मोठी कपात केली होती. ज्यानंतर त्यांना सर्वच स्तरातून मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
विरोधक आणि त्यांच्याच पक्षातल्या खासदारांनी त्यांच्या या कर प्रणालीला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना ती मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती.
कर प्रणाली मागे घेताच त्यांच्या अर्थमंत्र्यांनीसुद्धा राजीनामा दिला. त्यांच्या जागी जेरेमी हंट यांची नियुक्ती करण्यात आली होती.
ज्या कामासाठी पक्षानं माझी नियुक्ती केली होती, ते मला करता आलेलं नाही. म्हणून मी राजीनामा देत आहे, असं लिझ ट्रस यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे.
लिझ यांच्या राजीनाम्यानंतर एका आठवड्यात आम्ही पुढचा नेता निवडू असं हुजूर पक्षानं स्पष्ट केलं आहे.
लिझ ट्रस या आतापर्यंतच्या सर्वांत कमी काळ रहिलेल्या पंतप्रधान ठरवल्या आहेत. त्यांचा कार्यकाळ फक्त 44 दिवसांचा होता.
सध्याचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी ते पुढचे पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ऋषी सुनक यांच्याकडे लागल्या आहेत. ऋषी सुनक यांनी हुजूर पक्षाच्या नेतेपदासाठी लिझ ट्रस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.