‘मेड इन हेवन’ सीरिज मधला दलित मराठी मुलीच्या लग्नाचा एपिसोड वादात

0

ॲमेझॉन प्राईमवरील मेड इन हेवन ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे.

दिल्ली आणि एनसीआरमधल्या वेगवेगळ्या हायफाय लग्नांचं प्लॅनिंग करणाऱ्यांची ही गोष्ट आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये एका नवीन जोडप्याची लग्नाची गोष्ट दाखवली जाते.

यंदाच्या सीझन-2 च्या 7 भागांपैकी 5व्या एपिसोडची खासकरून चर्चा होताना दिसतेय.

नीरज घेयवान यांनी दिग्दर्शित केलेल्या या एपिसोडमध्ये दलित मुलीचं पंजाबी मुलासोबतचं लग्न दाखवण्यात आलं आहे.

यात राधिका आपटे ही पल्लवी मेनके नावाच्या एका दलित मुलीची भूमिका साकारताना दिसतेय, जिला तिचं लग्न बौद्ध रीतीरिवाजांप्रमाणे करण्यासाठी तिच्या होऊ घातलेल्या पंजाबी सासरच्यांशी संघर्ष करावा लागतो.

कौतुक आणि वादही

या एपिसोडच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक दलित बौद्ध विवाहसोहळा मुख्य प्रवाहात पाहायला मिळत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या भागाचं कौतुक केलं आहे.

मात्र हा एपिसोड एका वादातही सापडला आहे.

या भागात पल्लवी मेनके हे पात्र उच्चशिक्षित आहे, ती अमेरिकेत प्राध्यापिका आहे. तिने आपला एक दलित महिला म्हणून जगाला सामोरं जाण्याचा संघर्ष तिने एका पुस्तकातून मांडल्याचंही या भागात सुरुवातीला दाखवलं जातं.

दरम्यान, Coming out as a Dalit या पुस्तकाच्या लेखिका यशिका दत्त यांनी राधिका आपटेने साकारलेलं पात्र त्यांच्या जीवनापासून प्रेरित आहे, मात्र त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं क्रेडिट दिलं गेलं नाही, असं म्हटलंय.

एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये यशिका लिहितात, “आज नीरज घेवानसारख्या दिग्दर्शकांमुळे अनेक दलित पात्र बॉलिवुडमध्येही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत, जे आधी फक्त दाक्षिणात्य सिनेमांमध्येच दिसायचे. ‘मेड इन हेवन’चा पाचवा एपिसोड खरंतर दलित महिलांसाठी एक मोठा विजय आहे, ज्या एका जातीयवादी समाजात राहतात.”

“त्यातील एक पात्र तिच्या आजीची गोष्ट सांगतं, जी हाताने शौचालयं साफ करायची. मी माझ्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचं पडद्यावर असं रूपांतरण पाहून भारावून गेले होते. ते माझेच शब्द होते, जे पल्ल्वी मेनके नावाचं पात्र त्या एपिसोडमध्ये बोलत होतं. पण माझं नाव तिथे कुठेही नव्हतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सामूहिक विजयाच्या या क्षणाला एका वेगळ्याच नैराश्याचं गालबोट लागलं.”

जे विचार मी आयुष्यभर रुजवले, जे माझं काम आहे, ज्यासाठी माझा आजही प्रचंड तिरस्कार केला जातो, ते माझ्या परवानगीशिवाय वापरण्यात आले आहेत.”

दरम्यान, या एपिसोडचे दिग्दर्शक नीरज घेयवान यांनी यशिका दत्त यांच्या या पोस्टआधीच सोशल मीडियावरील चर्चांची दखल घेत इन्स्टाग्रामवर अनेकांचे आभार मानले होते.

त्यात त्यांनी दलित विचारवंत, लेखक सुरज येंगडे आणि सुजाता गिल्डा यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी यशिका दत्त यांच्या पुस्तकाचाही उल्लेख करत म्हटलं आहे की, पल्ल्वी मेनकेचं पात्र लिहिताना त्यातून प्रेरणा घेण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here