वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जॉर्जियाच्या फुल्टन काऊंटी तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. 2020च्या निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर निवडणुकीत हस्तक्षेप करणं, हे निकाल फिरवण्याचा प्रयत्न करणं, अशा स्वरुपाचे आरोप असलेल्या प्रकरणात डोनाल्ड ट्रंप यांच्यावर ही कारवाई सुरू आहे. याबाबतचे वृत्त बी बी सीने दिले आहे.
या प्रकरणी डोनाल्ड ट्रंप हे जॉर्जियाच्या फुल्टन काऊंटी तुरुंगात काल (24 ऑगस्ट) स्वतः हजर झाले. यानंतर ट्रंप यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर ट्रंप यांचा एक मगशॉट (आरोपीच्या चेहऱ्याचा फोटो घेण्याची प्रक्रिया) घेण्यात आला.
या निमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात डोनाल्ड ट्रंप यांचा मगशॉट घेण्यात आला आहे. येथील नियमांनुसार ट्रंप यांचा हा मगशॉट सार्वजनिकही करण्यात आला आहे. अटकेनंतर डोनाल्ड ट्रंप यांना तत्काळ जामीन देण्यात येणार असून जात मुचलक्यासाठीची रक्कम तब्बल दोन लाख डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला एका तक्रारदाराने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये जो बायडन यांच्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर हा निकाल फिरवण्याचा प्रयत्न करणे, या आरोपासह इतर अनेक आरोपांचा समावेश होता.
या प्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांना जॉर्जियामध्ये हजर होऊन आत्मसमर्पण करावं लागलं. गेल्या एका वर्षांत कोर्ट किंवा प्रशासनाकडे ट्रंप यांनी आत्मसमर्पण करण्याची ही चौथी वेळ आहे. फुल्टन काऊंटीमध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर तुरुंगाच्या नोंदवहीत त्यांच्या नावाची एन्ट्री करण्यात आली. तसंच त्यामध्ये त्यांच्याविरोधातील 13 विविध आरोप आणि इतर तपशीलही नोंदवण्यात आला आहे.
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रंप यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ट्रंप म्हणाले, “निवडणुकीला आव्हान देण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. मला वाटतं की त्या निवडणुकीत गोंधळ झाला होता. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. सर्वांनाच हे माहीत आहे. निवडणुकीत खोटेपणा झाल्याचं वाटत असल्यास त्याला आव्हान देण्याचे अधिकारही माझ्याकडे आहेत.”
अडीच वर्षांनंतर डोनाल्ड ट्रंप यांचं ट्विट
सुमारे अडीच वर्षांनंतर डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विट केलं आहे.
त्यांनी तुरुंगाकढून जारी करण्यात आलेला मगशॉटचा फोटो शेअर करताना म्हटलं, “निवडणूक हस्तक्षेप, शरणागती नाहीॅ”
आपल्या या ट्विटमध्ये ट्रंप यांनी आपल्या वेबसाईटची लिंकही दिली आहे. याच वेबसाईटच्या माध्यमातून ट्रंप यांच्यासाठी निवडणूक निधी जमा केला जातो.
डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वी ट्विट 8 जानेवारी 2021 रोजी केलं होतं. पुढे त्यांच्यावर ट्विटरवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर ट्रंप यांनी स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ हे सुरू केलं होतं.
गेल्या वर्षी ट्विटर कंपनी इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्रंप यांच्यावरील बंदी हटवली होती. पण गेला एक वर्षभर ट्रंप त्याचा वापर करत नव्हते. मात्र आता अडीच वर्षांनी त्यांनी ट्विटरचा वापर केला.
ट्रंप यांच्यावर नक्की काय कारवाई झाली आहे?
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातील फिर्यादीने ट्रंप यांच्यावर अनेक आरोप लावले. 2020च्या निवडणुकीत जो बायडन यांची मतं चोरण्याच्या कटात सहभागी असल्याचा आणि या राज्यात होत असलेल्या निसटत्या पराभवातून स्वतःला वाचवण्याचा हेतू त्यांचा होता असा आरोप ट्रंप यांच्यावर आहे.
ट्रंप यांच्यावर 13 आरोप असल्याचा उल्लेख या लेखी आरोपपत्रात आहे. हे त्यांच्याविरोधातले या वर्षातले चौथे लेखी आरोपपत्र आहे. गुरुवारी त्यांनी जॉर्जियातल्या अधिकाऱ्यांसमोर समर्पण केले आणि त्यांच्यावर हे आरोप ठेवण्यात आले.