श्रीसंत एकनाथमहाराज जलसमाधी चतुःशतकोत्तर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

0

पैठण,दिं.२५.(प्रतिनिधी) : ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवत चतुःशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (४५० वे) वर्ष तथा शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराज जलसमाधी चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सवी (४२५ वे) वर्षानिमित्ताने श्रीक्षेत्र पैठण येथे दिनांक २० नोव्हेंबर २०२३ ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालखंडात श्री एकनाथी भागवत पारायण व भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

 आठही दिवस पारायण करणाऱ्यांना प्रसादरुपी ग्रंथ भेट देण्यात येणार आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या नोंदणीकृत भाविकांच्या निवासाची व भोजनाची निःशुल्क व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे.यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील सर्व अधिपती, पैठणवासीय भाविकांसह पैठण तालुका व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन भाविक भक्त या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.  त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिगण तथा खासदार आमदारानाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे योगीराज महाराजांनी सांगितले.

   विशेष म्हणजे यावेळी पैठण येथील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना व भाविकांना नेहमीच उत्तम सेवा देणाऱ्या पत्रकार, स्वच्छ्ता कर्मचारी, पोलीस बांधव, शासकीय प्रशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, रिक्षा चालक, एस टी कर्मचारी, शालेय प्रतिनिधी, वारकरी शिक्षण संस्था चालक तथा महाराज मंडळी, पुरोहित वर्ग, समाज सेवक आदींचा या आठ दिवसात सन्मान करण्यात येणार आहे.भागवताच्या ४०० व्या जयंतीचा सोहळा तत्कालीन श्रीएकनाथसंस्थानाधिपती नाथवंशज हभप वै. श्री भैय्यासाहेब महाराज गोसावी यांनी त्यांच्या नियोजनात इ.स. १९७३ साली मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. त्याचप्रमाणे हा सोहळा ऐतिहासिक करण्याचे योजिले आहे. 

पारायण करू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुढील क्रमांकावर नोंदवावीत.

निलेश पाटील – ७५०६१६३७४७, अक्षय थोरात – ९६०४६७०४९८, घनश्याम गिरी – ९९२२९५०७०९,जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नाथवंशज हभप श्री योगिराजमहाराज गोसावी पैठणकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here