सातारा जिल्ह्यात लम्पीने तीन पशुधनाचा बळी, आतापर्यंत ९१ जनावरे बाधित

0

सातारा :  : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा पुन्हा शिरकाव झाला असून पाच तालुक्यात आतापर्यंत ९१ जनावरे बाधित झाली आहेत. तर तीन पशूधनाचा बळी गेला आहे. यामुळे पशुपालकात धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, लम्पी प्रतिबंधासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम वेगात सुरू केली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून लम्पी चर्मरोगाचा शिरकाव झाला. कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी गावात प्रथम लम्पी बाधित आणि मृत पहिल्या जनावराची नोंद झाली. त्यानंतर जिल्ह्यात लम्पीचा प्रसार वाढत गेला. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील जनावरांना या आजाराने गाठले. त्यावेळी पशुसंवर्धन विभागाने लम्पी संकटापासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली होती. गोवंशीय जनावरांनाच हा रोग होत होता. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गोवंशीय जनावरांचे लसीकरण पूर्ण केले. या लसीकरणानंतर मात्र, लम्पीने बाधित होणाऱ्या जनावरांचा आकडा कमी होत गेला. मार्चपर्यंत लम्पीला अटकाव बसला होता. मात्र, आता पुन्हा लम्पीचे संकट पुन्हा येत आहे.

जिल्ह्यात लम्पी चर्मरोग संकटाची दुसरी लाट सुरू आहे. आतापर्यंत माण तालुका, खटाव, फलटण, कऱ्हाड आणि कोरेगाव या तालुक्यात ९१ जनावरांना लम्पी चार्मरोग झाल्याचे समोर आले आहे. तर तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. बाधित जनावरांमध्ये गाईंची संख्या ६३ आणि बैलांची २८ आहे. तर पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली असून गोवर्गिय ३ लाख ४३ हजार ४०४ पशुधनाला लस देण्यात आलीआहे. याचे प्रमाण ९७.४ टक्के आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here