कोपरगाव- येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालयास नॅक समितीने नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या समितीत चेअरपर्सन प्रो. झक्केरीया के. ए. (केरळ), समन्वयक सदस्य प्रो.नारायणन राजू (तामिळनाडू), सदस्य प्रि.डॉ.संजयकुमार पांडे (उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता. तीन सायकल पूर्ण करून चौथ्या सायकलला जात असलेल्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयाची पाहणी करताना समितीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केलेले सादरीकरण, IQAC समन्वकांचे सादरीकरण,विभागप्रमुखांनी विभागांचे केलेले सादरीकरण पाहण्याबरोबरच संस्था पदाधिकारी, विभाग प्रमुख, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेतर सेवक, विविध समिती प्रमुख यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला.
सदर भेटीत समितीने राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. विभाग, कमवा व शिका योजना, विद्यार्थी विकास मंडळ, वनस्पती शास्त्रीय उद्यान, आरोग्य केंद्र, योग केंद्र, इनोव्हेशन अॅण्ड इंक्लूबेशन सेल, संगणक विभाग, अतिथिगृह, डिजिटल ग्रंथालय, इन डोअर व आउटडोअर गेम सुविधा असलेला जिमखाना, प्लेसमेंट सेल, करिअर कौन्सिलिंग सेंटर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, लँग्वेज लॅब, अपंगांसाठीचे रॅम्प असेंबली पॉईंट, कर्मवीर प्रदर्शन दालन अशा विविध स्थळांना तसेच, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प, ई.टी.पी. प्लांट फॅसिलिटी, बायोगॅस प्रकल्प अशा विविध प्रकल्पांना भेटी देऊन त्यांची पाहणी केली. सायंकाळी समितीने, विद्यार्थ्यांनी कलागुणांचा आविष्कार घडविलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही मनमुराद आस्वाद घेतला.
३० व ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत संपन्न झालेल्या या नॅक समिती भेटी दरम्यान महाविद्यालयाचा परिसर हिरवी वनराई, दिशा दर्शक व संदेश दर्शक फलक यांनी सुशोभित होण्याबरोबरच, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती व लगबगिने गजबजून गेला होता. सर्वच घटकांच्या चेहऱ्यावर औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासा, प्रसन्नता इत्यादी भाव संमिश्रतेने फुलून आलेले दिसत होते. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाला उत्तम गुणांसह उच्चतम मानांकन मिळण्याचा विश्वास निर्माण झालेला आहे. मात्र तरीही, सर्वच घटकांना नॅक समितीकडून मिळणाऱ्या मानांकनाची प्रतीक्षा आहे.