कोपरगांव :- दि. २२ ऑक्टोंबर २०२२
कामगार सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांतील दुचाकीस्वार कामगारांना अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते मोफत हेल्मेट वितरणाचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर करण्यांत येवुन त्यांनी सर्व सभासद शेतक-यांसह कामगारांना दिपावलीच्या सदिच्छा दिल्या.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी चालू गाळप हंगामात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी १० लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उददीष्ट दिले असुन ते साध्य करण्यासाठी करावयाच्या नियोजनाची माहिती प्रास्तविकात दिली. याप्रसंगी कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, गणपतराव दवंगे, मुख्य रसायनतज्ञ विवेककुमार शुक्ला, मुख्य अभियंता के. के. शाक्य, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव सर्व खाते प्रमुख, उप खातेप्रमुख कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने संघर्ष करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे नांव देशात उज्वल केले आहे. साखर गाळप त्यातुन रासायनिक उपपदार्थ निर्मीती, ज्युस पासुन इथेनॉल उत्पादन, बायोगॅस, सहवीज निर्मीत, अडचणींवर मात कशी करावयाची इत्यादी छोटया छोटया घटकांची माहिती त्यांच्या सानिध्यात राहुन शिकता आली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली चालू गळीत हंगामात कारखान्यांची क्षमता सहा हजार मे. टनापर्यंत वाढविण्याची वाटचाल सुरू असुन त्यादृष्टीने आधूनिकीकरणाची कामे करण्याचा प्रयत्न आहे. खाजगी साखर कारखानदारीशी स्पर्धा करतांना सहकाराला मर्यादा येतात पण स्पर्धेत टिकायचे असेल तर आधूनिकीकरण अत्यावश्यक आहे. कारखान्यांच्या प्रगतीत सभासद शेतक-यांसह सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे. कारखाना हे शरीर असले तरी कामगार हा त्याचा आत्मा आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षीततेची काळजी सातत्याने घेतली जाते त्यातुनच दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट देण्याचा उपक्रम साकारला जात आहे असेही ते शेवटी म्हणाले. वेणूनाथ बोळीज यांनी आभार मानले.
फोटोओळी-कोपरगांव
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांतील दुचाकीस्वार कामगारांना अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते मोफत हेल्मेट वितरणाचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर करण्यांत आला यावेळी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्यासह सर्व खातेप्रमुख उप खातेप्रमुख उपस्थित होते.
(छाया-जय जनार्दन फोटो, संजीवनी.)