कोपरगाव:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज ‘विद्यार्थी सु-संवाद’ उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताची गौरवशाली परंपरा अधोरेखित करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, धार्मिक व जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन केले. विद्यार्थी जीवन हा मानवी जीवनातील सुवर्णकाळ आहे. या काळात प्रत्येकाने शिस्त अंगीकारणे महत्वाचे आहे. शिस्ततेमुळे विद्यार्थी केवळ यशस्वीच होत नाहीत तर तो जबाबदार नागरिकही बनत असतो. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास करून व अंगी शिस्त बाळगून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या बेशिस्त वर्तनाचा शिक्का पुसून टाकावा असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. ‘विद्यार्थी सुसंवाद’ उपक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकत्वाची महाविद्यालयाने घेतलेली जबाबदारी नमूद करतांनाच महाविद्यालयाच्या शैक्षणिक जडणघडणीत कोपरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सतत मिळत असलेल्या सहकार्याचे कौतुक केले. या ‘विद्यार्थी सु-संवाद’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी तर आभारप्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. बी.आर.सोनवणे यांनी केले. या ‘विद्यार्थी सु-संवाद’ कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, प्रा. गोरखनाथ डोंगरे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.