जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल होत शांततेच्या मार्गानं संघर्ष करुया, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांनी अंतरवाली सराटी गावात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते.
शांततेच्या मार्गानं संघर्ष करु
शरद पवार यांनी अंतरवाली सराटी गावातील आंदोलकांशी संवाद साधला. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी यापूर्वी अनेक आंदोलनं झालेली आपण पाहिली आहेत. जालना जिल्ह्यात एखादा व्यक्ती शांततेच्या मार्गानं आंदोलन करतो. समाजाच्या मुलाला सवलती मिळाव्यात, या सवलतींसाठी छोटी मोठी आंदोलन करण्यात आली, असं शरद पवार यांनी सांगितलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर आश्वासनं दिली गेली होती. दुर्दैवानं जे काही ठरलं होतं त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळं मनोज जरांगे यांनी उपोषणाचा कार्यक्रम हाती घेतला, असं शरद पवार म्हणाले.
आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मी काल सगळी माहिती घेतली. सरकारी अधिकारी, पोलीस उपोषणकर्त्यांशी चर्चा करायला आले आणि पोलीस दुसऱ्या बाजूनं आणले गेले. चर्चा चालू असताना बळाचा वापर करुन काही संबंध नसताना लाठीहल्ला करण्यात आला, बळाचा वापर केला गेला. याशिवाय गोळीबार केला गेल्याचं ऐकण्यात आलं, असं शरद पवार म्हणाले. पोलीस बळाचा वापर करणं योग्य नव्हतं, असंही ते म्हणाले. पोलीस अधीक्षकांनी जे आदेश दिले त्याचा तीव्र निषेध करतो आणि जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागं घेण्यासाठी प्रयत्न करतो, असंही उदयनराजे भोसले म्हणाले.
या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारवर दबाव आणण्यासाठी शांततेच्या मार्गानं करुया, आंदोलन बदनाम काही न करता शांततेच्या मार्गानं आवाज उठवू, असं शरद पवार म्हणाले. शिवछत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधी उदयनराजे भोसले अंतरवाली सराटी येथे आले आहेत. ज्यावेळी असे प्रसंग निर्माण होतात त्यावेळी ते राजे आहोत याचा विचार न करता समाजासाठी दाखल होतात, ते इथं आले त्याबद्दल त्यांना अंतकरणातून धन्यवाद देतो, असं शरद पवार म्हणाले
न्यायालयीन चौकशी करा
खासदार उदयनराजे भोसले यांनी हा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी केली. जखमींच्या उपचाराची जबाबदारी शासनानं घ्यावी. हा जो अनुचित प्रकार घडला त्याबाबत न्यायालयीन चौकशी करावी, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं. आपण सगळ्यांनी शांततेत आपलं आंदोलन चालू ठेवावं, येत्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री आणि आंदोलनकर्त्यांची बैठक घडवून आणतो, असं आश्वासन त्यांनी दिलं. मराठा समाजाचे ५७ मोर्चे झाले त्यावेळी अनुचित प्रकार घडला नाही, पण मराठा समाजाची परीक्षा बघू नका, असंही ते म्हणाले.