मुबई :जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यासाठी मंत्रालयातून गुप्त फोन गेला होता . आणि त्यानंतरच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या फोन प्रकरणाची चौकशी करण्याचे आव्हानही राऊत यांनी यावेळी केले आहे.
मंत्रालयातून आलेला आदृश्य फोन कोणाचा होता? मुख्यमंत्र्यांचा की गृहमंत्र्यांचा? की दिल्लीतून आला? त्याची चौकशी करा. सांगा तो अदृश्य हात कुणाचा होता? सांगा? नाही तर आम्ही सांगू. लाठीमाराचा इतका मोठा निर्णय पोलीस पातळीवर घेतला जाऊ शकत नाही. पोलीस स्वत:हून लाठीमार करू शकत नाही. कुणी आदेश दिले? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मराठा समाजाचं आंदोलन सुरू असतानाच मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होती. या बैठकीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हा लाठीमार करण्यात आला. इंडिया आघाडीच्या बैठकीला गालबोट लावण्यासाठी लाठीमार करण्यात आली. बैठक यशस्वी झाली म्हणून पोट दुखले का? अजित पवार यांनी सांगावं? असं आव्हानच त्यांनी दिलं.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली. स्वस्थ कसे बसले? झोपलेत ते. त्यांना आंदोलन चिरडायचं आहे. स्वस्थ बसला नसता तर आंदोलनावर लाठीमार केला नसता.
त्या गावात आज पोलीस जाऊ शकत नाही. आम्ही गावात गेलो तेव्हा पोलिसांशीवाय गेलो. पोलीस वेशीवर थांबले. पोलीस गावात जाऊ शकत नाही हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. पोलिसांवर हल्ले होत आहेत. पोलिसांची वाहने जाळली जात आहेत. हे लोण राज्यात पसरले आहे. याला जबाबदार हे सरकार आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
म्हणून लाठीमार केला
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आंदोलन चिरडलं पाहिजे असं का वाटलं? उपोषणकर्त्यांना फरफटत नेण्याचा प्रयत्न होता. आंदोलनकर्ते मनोज यांना खेचण्याचा प्रयत्न केला. त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असं सांगतानाच जालन्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठीच मराठा आंदोलनावर लाठीमार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
पोलिसांना इशारा
यावेळी संजय राऊत यांनी पोलिसांनाही इशारा दिला. 2024 पर्यंत जे काही आदेश पाळायचे ते पाळा. पण चुकीचे आदेश पाळणाऱ्यांची गय करणार नाही हे आम्ही पोलिसांना सांगू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.