जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरील पोलीस लाठीमाराचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यातील काही शहरांत मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) बंदच आवाहन केलं आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रामुख्याने समावेश आहे. तसंच, राज्यभर स्थानिक पातळीवरही निषेध नोंदवण्यासाठी लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
या प्रकरणी राज्य सरकारकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानंतर, जालना येथील पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, लाठीमार प्रकरणानंतर जालना जिल्ह्यात 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी जमावबंदी संदर्भात आदेश दिले आहेत. सोमवार 4 सप्टेंबरपासून 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत जालन्यात जमावबंदी असणार आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात 5 अधिक जणांना एकत्र जमण्यास, सभा, मोर्चा, मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे, राजकीय नेते अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेत आहेत. शनिवारी (2 सप्टेंबर) आमदार रोहित पवार, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जखमी आंदोलकांची भेट घेतली आणि आंदोलकांशी संवादही साधला.
शुक्रवारी (1 सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. यात आंदोलक आणि पोलीस दोघेही जखमी झाले आहेत.