सातारा/अनिल वीर: दीपलक्ष्मी पतसंस्था शाखा – शाहूपुरी तर्फे ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.आ.ह. साळुंखे लिखित पुस्तकांचा सवलतीच्या दरात विक्री सप्ताहास सुरुवात करण्यात आली आहे.
दीपलक्ष्मी पतसंस्थेने माझ्या ग्रंथ विक्रीच्या दालनाची निर्मिती केली असून विक्री सप्ताह आयोजित करून एक अभिनव उपक्रम राबविला आहे. असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ.आ.ह.साळुंखे यांनी काढले.येथील दीपलक्ष्मी पतसंस्था शाखा – शाहूपुरीच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या लेखकांची सदिच्छा भेट या कार्यक्रमात डॉ. आ.ह.साळुंखे यांनी काढले. सदरच्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस, सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका पाटील, पी.एस.आय धनाजी फडतरे कवी वसंत शिंदे,
प्रा. श्रीधर साळुंखे,श्रीकांत कात्रे, संचालक आप्पासा शालगर, लालासो बागवानवि.ना. लांडगे, व्यवस्थापक विनायक भोसले, लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडामाचे अध्यक्ष ला.आग्नेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.आ.ह. साळुंखे म्हणाले, “दीपलक्ष्मीचे शिरीष चिटणीस व माझे दीर्घकाळाचे ऋणानुबंध आहेत. संस्थेच्या शाहूपुरी शाखेने यापूर्वीही एखाद्या ग्रंथालयाप्रमाणे माझी पुस्तके वाचकांसाठी कपाटात ठेवली होती.” उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे म्हणाले,”आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीवर प्रेम केले पाहिजे.डॉ.आ. ह.साळुंखे यांचे एक एक ग्रंथ सखोल चिंतनातून जन्माला आले आहेत. किंबहुना त्या ग्रंथांनी समाजाला विचारांची बैठक दिली आहे. असे ग्रंथ वाचकांनी वाचले पाहिजेत” शिरीष चिटणीस म्हणाले,”संपूर्ण महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणारे सर्वांचे आदरणीय डॉ.आ.ह. साळुंखे हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणातून समाजातील विविध विषयांचा सखोल विचार केला आहे.” प्रा. श्रीधर साळुंखे म्हणाले, “डॉ.आ.ह.साळुंखे म्हणजे महाराष्ट्राचे वैचारिक व सांस्कृतिक विद्यापीठ आहेत. त्यांच्या प्रत्येक अक्षरा पाठीमागे चिंतनाची साधना उभी असते.त्यांच्या साहित्याचे वाचन म्हणजे माणूस अबाधित ठेवण्याच्या संस्काराचे वाचन होय. ज्ञानाचा दीपाचा प्रकाश विवेकाने लक्ष्मीचा वापर कसा करायचा ? हा संस्कार रुजवणारा उपक्रम आहे. मोबाईल संस्कृतीत काचेवरती बोट ठेवून वाचनाची सवय लागलेल्या जमान्यात ती अक्षरे बुभळाला धडकून गायब होऊन जातात.पण ग्रंथ हातात घेऊन कागदावरती बोट ठेवून जे वाचले जाते ते काळजावरती कोरले जाते.म्हणून प्रत्यक्ष ग्रंथ हा खरा संस्कार आहे त्यामुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल.असे संस्कार डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या ग्रंथामधील सामर्थ्य आहे.”श्रीकांत कात्रे म्हणाले, “डॉ.आ.ह.साळुंखे यांचे विचार समाजापर्यंत व लोकांपर्यत पोहचविण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यातही डॉ.आ.ह.साळुंखे यांचे परिवर्तनाचे विचार पोहचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.” शाखाधिकारी रवींद्र कळसकर यांनी आभारप्रदर्शन केले.