कोपरगावातील सकल मराठा समाजाच्या आमरण उपोषणाची सरकारने तातडीने दखल घ्यावी -स्नेहलताताई कोल्हे

0

कोल्हे यांचा सकल मराठा समाजाच्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा

कोपरगाव : मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयात टिकेल असे भक्कम आरक्षण त्वरित द्यावे यासह इतर मागण्यांसाठी कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची केंद्र व राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी. पालकमंत्र्यांनीही या उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन उपोषणकर्त्यांच्या भावना सरकारकडे पोहोचवून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी आग्रही मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे. प्रशासनाने हे उपोषण हलक्यात घेऊ नये, या उपोषणकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकेल असे भक्कम आरक्षण त्वरित लागू करावे या व इतर मागण्यांसाठी कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत हे सोमवार (११ सप्टेंबर) पासून कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमरण उपोषणास बसले आहेत. माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी बुधवारी (१३ सप्टेंबर) रात्री उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषणास आपला संपूर्ण पाठिंबा आहे. मराठा समाज मुख्यत्वे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मराठा समाजातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे आज शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असून, शेती व्यवसाय धोक्यात आल्याने अन्नदाता असलेला हा समाज मोठ्या अडचणीत सापडला आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला समाज आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी यापूर्वी सकल मराठा समाजबांधवांनी शांततेत व शिस्तीत राज्यभर मूकमोर्चे काढले. त्याची संपूर्ण जगाने दखल घेतली. आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे कायदेशीर पाठपुरावा करून लोकसभेच्या आगामी अधिवेशनात भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करून शेड्युल ९ मध्ये तरतूद करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत योग्य कार्यवाही करावी, राज्य सरकारने केंद्रीय मागास आयोगाकडे पाठपुरावा करून मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयात टिकेल असे उचित भक्कम आरक्षण त्वरित द्यावे, असे त्यांनी सांगितले. सर्व राजकीय पक्षातील मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणीही स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here