मुंबई : शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांपैकी २२ आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटानं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर असलेल्या रोखठोकमधून हा दावा करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपनं तात्पुरती व्यवस्था निर्माण केली आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकलं आहे, अशी टीका सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील, असं म्हणत शिंदे गट आणि भाजपवर सामना रोखठोकमधून निशाणा साधला आहे.
शिंदे गटातील कमीत कमी २२ आमदार नाराज; ठाकरे गटाचा दावा
सामनातील रोखठोक सदरातून ठाकरे गटानं मुख्यमंत्री शिंदेंसह भाजपवर निशाणा साधला आहे. रोखठोकमध्ये म्हटलंय की, “महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते.” तसेच, “एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील.”
सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसतात : रोखठोक सदर
“मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले.”, असं रोखठोक सदरातून म्हटलं आहे. तसेच, सदरातून पुढे एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधण्यात आला आहे. “धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस आणि भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत. पोलिसांच्या बदल्यांत आणि आपले अधिकारी नेमण्यात त्यांना जास्त रस आहे.”, असंही ते म्हणाले आहेत.
“मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो. ठाण्यातील ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमासाठी शिवसेनेस तलावपाळी परिसर मिळू नये यासाठी पुन्हा हायकोर्टात जावे लागले आणि ठाणे महानगरपालिकेने शिंदे गटाने सर्वप्रथम परवानगी मागितली या सबबीखाली खासदार राजन विचारे यांना परवानगी नाकारली. पण दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्क मैदानासाठी हा नियम पाळला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने या अशाच कार्यात गुंतवून ठेवले आहे.”, असं म्हणत थेट शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.