संगमनेर येथे शासन आपल्या दारी तालुकास्तरीय कार्यक्रम संपन्न
शिर्डी, दि.२० सप्टेंबर (उमाका) – निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या कालव्यातून २७ सप्टेंबर पासून पाणी सोडण्यात येईल. अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण यांनी संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात दिली.
संगमनेर येथील शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे आदी यावेळी उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ अभियानात संगमनेर तालुक्यातील एक हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. असे नमूद करून महसूलमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, महिलांना देशपातळीवर आरक्षण देऊन देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासन आपल्या दारी योजनेत जिल्ह्यात जवळपास २४ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. एक रूपयात पीक विमा सारखी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी योजना आणली. यामुळे जिल्ह्यात ११ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. राज्यात ‘शासन आपल्या दारी’ योजनेत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
शासनाच्या प्रत्येक योजनेत तरूण सहभागी झाला पाहिजे यासाठी ‘युवा ही दुवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील . ऑनलाईन दाखल्यांसाठी फी आकारणी करणारी सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारी आल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल. अवैध वाळू वाहतूकीला लगाम बसला आहे. जलजीवन मिशन मधील अवैध कामांना आळा घालण्यासाठी काम करण्यात येईल. लोकांच्या मनातील सरकार आहे. शासनाने घरोघरी आनंदाचा शिधा वाटप केला. कोणीही शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले , शासन आपल्या दारी उपक्रमांत आपण वेगवेगळ्या विभागांना २५ लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. आज संगमनेर मधील ११०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिला आहे.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कृषी यांत्रिकीकरणात २३ टॅकर व नगरपालिकेला ४ घंटागाड्याचे वाटप करण्यात आले. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातील अमृत कलक्ष यात्रा व्हॅनचे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ५० पेक्षा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.
००००००००००००