सातारा/अनिल वीर : येथील न्यू इंग्लिश स्कुलमधील शिक्षकास मारहाण केल्याप्रकरणी त्या पालकांस जोपर्यंत अटक होत नाही.तोपर्यंत शिक्षकांनी शाळेच्या प्रवेशद्वारात सुरू केलेले आंदोलन थांबविणार नाही.असा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.
शहरातील सोमवार पेठेतल्या नामांकित असलेल्या शाळेत एका पालकाने जावून शिक्षकाला भर वर्गात बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. जखमी झालेल्या शिक्षकास उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्या पालकांकडून शिक्षक चुकीच्या पद्धतीने वागणूक मुलाला देत असल्याचा आरोप केला जात आहे. तर पिडीत शिक्षकाकडून तो विद्यार्थी वर्गात गोंधळ घालत होता. म्हणून त्यास समज दिल्याने चिडून जावून पालकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात बागवान नामक विद्यार्थी शिकत आहे. एनसीसीचे शिक्षक विजयकुमार गुरव यांना बेदम मारहाण विद्यार्थ्यांच्यासमोरच केली होती. झालेल्या मारहाणीमुळे काही काळ तणावाचे वातावरण शाळेत निर्माण झाले होते. इतर शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी त्या शिक्षकास मारहाणीपासून वाचवले. दरम्यान, त्यांना लगेच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत माजी विद्यार्थी संघटना,शिक्षक आदींनी आंदोलनास भेट देऊन पाठींबा दिला आहे.आजपर्यंतच्या शाळेच्या इतिहासात पालकांनी शाळेत जावून शिक्षकाला मारहाण करण्याचा प्रकार घडला नव्हता.पत्रकारांनी विचारले असता गुरव म्हणाले वर्गात बागवान नावाचा विद्यार्थी इतर मुलांच्या खोड्या करत होता. बेशिस्त वर्तन करत होता.म्हणून त्याला समजून सांगितले असता त्याच्या पालकांनी मला मारहाण केली.शिक्षकाला मारहाण झालेली घटना चुकीची घडलेली आहे. पालकांच्या मनात चुकीची संकल्पना निर्माण झाली आणि त्यांनी ऑन ड्युटी असलेल्या शिक्षकाला मारहाण केली. या घटनेचा आम्ही निषेध करतो. शिक्षक सुद्धा आमचा आहे. विद्यार्थी सुद्धा आमचा आहे. पालकही आमचा आहे. या घटनेमध्ये नेमके काय झाले ? हे तपासात पुढे येईलच. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.अशी माहिती शालेय समितीचा अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी दिली.शाळेतील सर्व पदाधिकारी व शिक्षक यांनी मारहाण करणाऱ्या पालकास अटक केल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.