वेगळे करण्याची इच्छा- जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी
– प्रा.प्रसाद बेडेकर नगर – आज विद्यार्थ्यांच्या पाठिवरील दप्तरांचे ओझे हा राष्ट्रीय विषय झाला आहे. शिक्षण तज्ञ, डॉक्टर त्याचबरोबर शासनही विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा एवढा ताण पडत आहे की, त्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्यातील कला-गुणांना वाव देणारे उपक्रम शाळेत राबविणे गरजेचे आहे.
त्यातील दप्तरमुक्त दिवस हा चांगला प्रयत्न आहे. महिन्यातील किमान एक दिवस अभ्यासाव्यतिरिक इतर उपक्रमातून काही तरी वेगळे करण्याची इच्छा- जिज्ञासा त्यांच्यात निर्माण होणे गरजेचे आहे. आज प्रत्येकक्षेत्र इतके विस्तारत आहेत, त्यामुळे आपल्या पाल्यातील, विद्यार्थ्यांमधील गुणांना चालना दिल्यास कला, क्रीडा, विज्ञान अशा क्षेत्रातही ते नैपुण्य मिळू शकतात. लहान वयातही अनेक स्पर्धांमधून सहभागी होत मुले भविष्यातील दिशा ठरवत आहेत. श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत नेहमीच नवनवीन उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधत आहे, असे प्रतिपादन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले.
सांगळे गल्ली येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत दप्तरमुक्त दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा.प्रसाद बेडेकर यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, मुख्याध्यापक अजय महाजन आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक अजय महाजन म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचाही सहभाग असतो. दप्तरमुक्त दिवस उपक्रमांतून अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे दडपण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश मेढे, श्रीमती मिना बंगाळ, सौ.वैशाली मगर, शंकर निंबाळकर, संदिप गायकवाड, सोनाली कोलते, श्रीमती आल्हाट आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिलोत्तमा क्षीरसागर यांनी केले तर आभार दिपा सप्तर्षी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.