सातारा : मराठा आरक्षणाचा लढा जिल्ह्यात अधिक तीव्र होऊ लागला आहे. आतापर्यंत 81 गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावांत नेत्यांना बंदी व मतदानावर बहिष्कार घालण्याचे निर्णय घेतले जात आहेत.
तसेच अनेक पदाधिकारी आपल्या पदांचे राजीनामे देऊन आरक्षणाची मागणी करत आहेत. शुक्रवारी कोरेगाव व शिरवळमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. सातार्यात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आंदोलकांनी हजेरी लावली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे-पाटील यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. दसर्याच्या मुहूर्तावर शासनाला दिलेली मुदत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. मराठा योद्धा जरांगे-पाटील यांच्या उपोषणास बाईक रॅली, मोर्चा, कँडल मार्च, नेत्यांना गावबंदी, मतदानावर बहिष्कार, अशा विविध आंदोलनांच्या मार्गाने पाठिंबा मिळत आहे; तर काहींनी आपल्या पदाचा राजीमाना दिला आहे. जिल्ह्यात याचा परिणाम दिसून येत आहे.
जिल्ह्यातील फलटण, पाटण व सातारा येथे बुधवारपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषणाला सुरुवात झाली. त्यानंतर वाई, कोरेगाव व शिरवळमध्येही उपोषण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 81 गावांमध्ये आतापर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. दोन दिवसात जिल्ह्यातील 28 गावांनी गावबंदीचे फलक लावले आहेत. सातारा शहरात साखळी उपोषणाला मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांनी हजेरी लावू
लागले आहेत. दरम्यान, सातारा तालुक्यातील काशीळ, शिवथर, अपशिंगे (मि) माण तालुक्यातील दिवडी, कुक्कुडवाड, इंजबाव, काळचौंडी, किरकसाल, निमसोड, मोही, गोंदवले बुद्रुक, तोंडल, दिवड, भालवडी, खडकी (पाटोळे), वडजल, वरकुटे म्हसवड, मोगराळे, उकिर्डे, पांढरवाडी, कराड तालुक्यातील कोर्टी, वाई तालुक्यातील लोहारे, शेलारवाडी व वरखडवाडी, खटाव तालुक्यातील तरसवाडी, मरडवाक व फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी, वाठार निंबाळकर व निरगुडी या गावांनी गावबंदीचे फलक लावले आहेत.