येवला, प्रतिनिधी
सकाळ पासून आख्या शहरात एकच धूम होती…घरोघरी फक्त आणि फक्त तयारी होती ती दाराच्या अंगणात रांगोळी काढण्याची..महिलांनी एकच नाही तर चार-चार तास बसून आपल्यातील कलेला जीव ओतून मेह्नीतीने सादर केले.अन जेव्हा घरासमोर हि सप्तरंगी छटाची देखणी कलाकृती पूर्णत्वास गेली तेव्हा नागरिकांना कौतुक करण्याचा मोह आवरला हेला नाही.महिलांनी कलाविष्कार साधत देखण्या पैठण्या देखील रांगोळीतून साकारत लक्ष वेधले.यासाठी निमित्त ठरले ते कुणाल दराडे फौंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचे..
या शहराने गेल्या दोन अडीचशे वर्षापासून उत्सवप्रियता जपली आहे.संक्रांतीला पतंगोत्सव असो की रंगपंचमीला रंगाचे सामने…प्रत्येक सणाचे वेगळेपण येथे जपले जाते.दिवाळीची अशीच जोमाने साजरी करताना संपूर्ण शहरभर काढली जाणारी रांगोळी अफलातून असते. महिलाच नव्हे तर मुली,युवक आदींनी देखील अगदी हिरीरीने यात आपला सहभाग नोंदवला.ऐतिहासीक वारसा लाभलेलं, कलासक्त आणि प्रत्येक सण उत्सव वेगळेपणानं साजरा करणारं हे गाव आहे.मागील वर्षापासून कुणाल दराडे फाऊंडेशनने ही स्पर्धा घेणे सुरु केले असून महिलांचा उत्साह वाढला आहे.विविध रंगांच्या रांगोळ्यातुन उत्कृष्ट कलाविष्कार साधत महिलानी एकाग्रतेने पाच-सात तास घालवून मग्न होत हे रेखाटन साकारले होते.टिपक्यांची रांगोळी,संस्कार भारती आणि विषयाचे बंधन नसलेल्या अशा रांगोळ्या काढत १८० महिलांनी यात सहभाग नोंदवला.
शिवाजी महाराज,अयोध्यात साकारत असलेले श्रीराम मंदिर,देखण्या पैठणी,कोरोना वारियर्स,सिंधूताई सपकाळ,स्वच्छ भारत अशा अनेक सुंदरशा रांगोळ्यांनी लक्ष वेधले याशिवाय मातृप्रेम,पाणे-फुले,धार्मिक प्रसंग,पशु-पक्षी,व्यक्तीचित्रे,निसर्ग चित्रे,बेटी बचाव,थ्रीडी अशा विविध विषयावरील रेखाटलेल्या रांगोळ्या नजरेत भरणाऱ्या होत्या.रांगोळ्यांच सौदर्य खुलविण्यासाठी आकर्षक रोषणाई तर काही ठिकाणी मंजुळ सुरात ध्वनीफीत लावलेली दिसत होती.प्रत्यक्ष रांगोळ्या पाहिल्यावर त्या इतक्या सुंदर व त्यावर घेतलेली मेहनत पाहिल्यावर परिक्षकांची चांगलीच कसरत झाली.विशेष म्हणजे सायंकाळी सात वाजता सुरू झालेले परीक्षण रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होते. संगीता पटेल,निलिमा खानापुरे,श्रीकांत खंदारे,ज्योती खंदारे,अंकिता मानेकर,राकेश तडवी,तृप्ती राजपूत,शाल्वी पवार यांनी परीक्षण केले असून बुधवारी निकाल जाहीर करून पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.तीन हजाराचे पहिले, दोन हजाराचे दुसरे,एक हजाराचे तिसरे व चौथे पारितोषिक असून उत्तेजनार्थ पाचशे रुपयाची पारितोषिके देखील दिली जाणार आहेत.
“या शहराची उत्सवप्रियता राज्यभर प्रसिद्ध आहे.ती नव्या पिढीने जपावी व त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे,
दिवाळीचा घरोघरी असलेला आनंद अधिक द्विगुणीत व्हावा तसेच शहरातील उत्सव परंपरा कायम राहावी यासाठी आम्ही पुढाकार घेऊन या स्पर्धेचे आयोजन केले.महिला भगिनींनी सुंदररित्या रांगोळ्या काढून सर्वांचे लक्ष वेधले,शिवाय मोठ्या प्रमाणात प्रतिसादही दिल्याने उत्सवात नक्कीच भर पडली.”
-कुणाल दराडे,संस्थापक,फाऊंडेशन