ज्ञानदेव बेरड राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित
नगर – नुकतेच फैतेपुर (जि.जळगांव) येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनात नगर, केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांना राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ शालेय शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर, आ.ज्ञानेश्वर म्हात्रे, आ.शिरिष चौधरी, शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष सुनिल पंडित यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी केसरकर म्हणाले, शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत आहे, या बदलांचा स्विकार करुन या स्पर्धेच्या युगात आपले विद्यार्थी अव्वल कसे ठरतील, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक व शासन यांच्यातील दुवा म्हणून मुख्याध्यापक काम करत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शासन व शिक्षकांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगून गुणवंत मुख्याध्यापकांचा सन्मान करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी वर्षभर शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दाखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये विद्यालयाची गुणवत्ता वाढ व विकास प्रकल्प अंतर्गत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास कार्यक्रम राबविले. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकसन कार्यक्रम, शालाबाह्य परिक्षांचे आयोजन, सहशालेय उपक्रम, गणित विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांची पर्यावरण क्षेत्रभेट,आनंद मळावा, दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, शिक्षकांसाठी अभ्यास दौरा, हस्तलिखितांची प्रकाशन, विद्यार्थी, शिक्षकांकरिता लेख, निबंध, कविता, चारोळ्यांचे लिखान, शालेय इमारत व परिसर स्वच्छता, वृक्षारोपण व संवर्धन, परसबाग, योग-प्राणायम शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, राष्ट्रीय सण – उत्सव, थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम. त्याचबरोबर क्रिडा महोत्सव, स्नेह मेळावा आदि उपक्रम वर्षभर राबविले जातात.
या सर्व उपक्रमांची दखल घेत विद्यालयास व विद्यार्थ्यांना अनेक राज्य, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. गुणवंत विद्यालया पुरस्कार, स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार, जिल्हा परिषदेचा निर्मलग्राम पुरस्कार, जिल्हास्तरीय फाईव्ह स्टार मानांकन, केंद्रीस्तरीय स्वच्छ विद्यालय, असे विविध पुरस्कार विद्यालयाने प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांच्या मार्गदर्शनाखापली प्राप्त केले आहेत.
प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांना राज्यस्तरीय गुणवंत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भानुदास कोतकर, सचिव रघुनाथ लोंढे, माजी महापौर संदिप कोतकर, संचालिका वैशालीताई कोतकर आदिंसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.