मुख्यमंत्री साहेब, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा:धनगर समाजाची मागणी Deadline for Dhangar Reservation Expired…
नगर – धनगर आरक्षणासाठी Dhangar Reservation मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 50 दिवसांची मुदत संपली आहे, तरी आरक्षणाचे शासकीय पातळीवर साधं पानही हललं नाही, या विरोधात धनगर समाज बांधवांच्यावतीने मुख्यमंत्री यांच्या नावे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते निवृत्ती दातीर, राजेंद्र तागड, काका शेळके, इंजि.डि.आर.शेंडगे, भगवान जराड, अनिल ढवण, अशोक होनमाने, निशांत दातीर, बाबासाहेब तागड, ऋषी ढवण, भगवान पवार, प्रथमेश तागड, बिभिषण भंडारे, संभाजी रुपनर, कांतीलाल जाडकर आदि उपस्थित होते.
धनगर समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी चौंडीसह राज्यभर विविध ठिकाणी उपोषण करण्यात आले होते. हे उपोषण स्थागित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्यावतीने 50 दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. परंतु 50 दिवस पुर्ण होऊनही धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाहीय, ही खेदाची बाब आहे. राज्य प्रमुख म्हणून आपण मुख्यमंत्री पदी आहात. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ‘राजधर्म’ पाळावा लागतो. मुख्यमंत्री कोणत्याही विशिष्ट समुहाचे नसतात ते सर्वांचे असतात, सर्वसमावेशक असतात. एका विशिष्ट समुदायासाठी आपण खास प्रयत्न करता, धनगर आरक्षणाकडे उदासिनता दाखवता ही बाब अत्यंत खेदजनक आहे. आपण तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक मार्गाने चालणार्या तीव्र लढ्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे निवेदनात म्हटले आहे.
याचबरोबर धनगर समाजाच्या उद्धारासाठी 8 योजनांची मागणीही करण्यात आल्या. यामध्ये धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी. अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्यावतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत अॅड.कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करुन न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करणे. मेंढपाळासाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाचे घोषणा करुन योजना कार्यान्वित करावी. धनगरसमाजच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मेंढपाळांवरील हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करुन चराई कुरण क्षेत्र उपलब्ध करुन द्यावे. धनगर समाजाचे दैवत असलेल्या देवस्थांनाच्या सर्वांगिण विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी द्यावा. महाराज यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले वाफगाव चा विकास आराखडा तयार करावा. अहमदनगर नगर जिल्ह्याचे ‘अहिल्यादेवीनगर’ नामांतराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत आदि मागण्याही निवेदनाद्वारे केल्या आहेत.