वाई : वाईत गेल्या अनेक वर्षांची दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. रविवार दि. 26 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी सात वाजता वाईच्या गणपती घाटावर मोठ्या उत्साहात हजारो दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
कृष्णा नदी सेवा कार्य समितीच्यावतीने भव्य दीपोत्सवासोबत भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रत्येकाच्या हातात प्रज्वलित केलेला दीप होता. कृष्णा नदीच्या सातही घाटावर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेक वर्षांपासूनची परंपरा असून त्यात एकही वर्ष खंड पडलेला नाही. या दीपोत्सवासाठी महागणपती घाटावर नागरिकांनी गर्दी केली होती. फटाक्याच्या आतषबाजीत हा दीपोत्सव झाला.
त्रिपुरारी पौर्णिमेला नदीत दीप प्रज्वलित करून सोडण्याची प्रथा आहे. वाईकर ही प्रथा अनेक वर्षांपासून पाळत आलेले आहेत. कृष्णा पूल नव्याने उभारण्यात आल्याने दीपोत्सवाला नागरिकांचा आनंद व्दिगुणित झाला होता. कृष्णा नदीच्या उगमापासून ते कराडच्या त्रिवेणी संगमा पर्यंत प्रत्येक घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.