कोपरगाव : गोदावरी कालव्यांच्या Godavari canals लाभक्षेत्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही. त्यामुळे रब्बीसाठी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणारे आवर्तन १० डिसेंबरनंतर सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे Snehlatatai Kolheयांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
१६ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत यंदा रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन (रोटेशन) सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी शेतकरी बांधवांच्या भावना मांडत पाटपाण्याच्या आवर्तनाचे नियोजन काटेकोर करण्याची तसेच रब्बीच्या शिल्लक पाण्यातून उन्हाळी आवर्तनदेखील वाढवून मिळावे, अशी आग्रही मागणी केली होती. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामात दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून नियोजन सुरू आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला गोदावरी डावा व उजवा कालव्याद्वारे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. पाच दिवसांपूर्वी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाने कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असून, सद्य:स्थितीत लाभधारक शेतकऱ्यांची सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही. अजूनही या भागात पावसाळी वातावरण असून, जर पाऊस पडला आणि सिंचनासाठी आवर्तन सोडले तर ते पाणी वाया जाऊ शकते. या पाण्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही.
दारणा व गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात जे पाणी सोडण्यात येत होते व त्यात अवकाळी पावसामुळे थोडीशी कपात झाली आहे. हे वाचलेले पाणी आणि आगामी काही दिवसांत जर पाऊस पडला तर गोदावरी कालव्यांसाठी आणखी पाणी उपलब्ध होऊ शकते. या उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून गोदावरी कालव्यांना रब्बी हंगामातील दोन आवर्तनासह उन्हाळ्यातही दोन आवर्तने देणे शक्य होईल. त्या दृष्टीने नाशिक पाटबंधारे विभागाने नियोजन करावे. सध्या गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी होताना दिसत नाही. त्यामुळे सिंचनासाठी येत्या १० डिसेंबरनंतर आवर्तन सोडण्यात यावे आणि पुढील काळात शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवर्तन देण्याचा पाटबंधारे विभागाने प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे. त्याचबरोबर नादुरुस्त झालेल्या गोदावरी कालव्यांच्या वितरिका व उपवितरिकांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
चौकट….
७ नंबर अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी जलसंपदा विभागाकडून रब्बी हंगामात गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यासाठी गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज मागविले होते. तथापि, याबाबत जनजागृती झालेली नाही. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने अनेक शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ७ नंबर पाणी मागणी अर्ज वेळेत भरू शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ७ नंबर अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.