गोंदवले,विजय ढालपे : जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक या गावी मद्यबंदी व्हावी, यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मद्यबंदी ठराव संमत करण्यात आला आहे.
ग्रामपंचायती पोठोपाठ गावातील ‘तंटामुक्ती समिती’नेही मद्यबंदीचा ठराव सर्वानुमते संमत केला आहे.
गोंदवले बुद्रुक हे गाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले आहे. अशा ठिकाणी गावात भटकणारे मद्यपी आढळून येतात. ही गोष्ट अशोभनीय असून याचा त्रास महिला आणि भाविक यांना होत असतो. प्रतिगुरुवारी गोंदवले बुद्रुक येथे भरणार्या आठवडा बाजारामध्येही मद्यपी धिंगाणा घालतात. त्यामुळे गावात शांतता रहाण्यासाठी मद्यबंदीचा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत सर्व विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि दहिवडी पोलीस ठाणे यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.