गोंदवले : गोंदवले येथे जुगार खेळताना रंगेहात पोलिसांच्या हाती लागलेल्या प्राथमिक शिक्षकाची खात्यांतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी दिली.
माण तालुक्यातील पळशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक शशिकांत खाडे हा गेल्या काही दिवसांपूर्वी गोंदवले बुद्रुक येथे जुगार खेळताना दहिवडी पोलिसांच्या हाती लागला होता.त्याने यापूर्वीही अनेक कारनामे करून शिक्षण खात्याला काळीमा लावला आहे.
शाळेच्या गणवेशाची अवाजवी दराने विक्री करून त्याने अनेक शाळांना वेठीस धरल्याची घटना सुद्धा घडली होती. याच प्रकारातून त्याने एका शिक्षकाला मारहाण सुद्धा केली होती. शाळेच्या नावाखाली अनेक गैरकृत्य करणाऱ्या या शिक्षकाला जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडले असताना सुद्धा ‘मी तो नव्हेच’ असा आव आणून समाजात वावरताना दिसत आहे.
शिक्षकाच्या हातात पत्त्याची पाने आल्याने समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रवृत्तीमुळे शिक्षण विभागाची मान खाली गेल्याने माण तालुक्यातील शिक्षण विभाग आता खडबडून जागा झाला आहे.
जुगार प्रकरणी पोलिसांनी या शिक्षकावर केलेल्या कारवाईची माहिती शिक्षण विभागाने मागवून घेत वरिष्ठांकडे पाठवली असल्याची माहिती गटविकास अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी दिली आहे. वरिष्ठांकडे पाठवलेल्या अहवालामुळे शशिकांत खाडे याच्यावर काय कारवाई होणार याचीच चर्चा संपूर्ण शिक्षण विभागासह तालुक्यात सुरू आहे.