सातारा : उत्तर भारतातील थंडीचे लोण हळूहळू महाराष्ट्रात पसरत आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा प्रथमच यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर आल्याने महाराष्ट्र गारठला आहे.
शनिवारी (ता. १६) नगर जिल्ह्यातील जेऊर येथे राज्याच्या हंगामातील नीचांकी १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीच्या अनेक भागात किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे. तर पंजाबमधील अमृतसर आणि लुधियाना येथे देशातील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यातच राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १३ अंशांच्या खाली घसरला आहे. गारठा वाढू लागल्याने जेऊर पाठोपाठ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११ अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे ११.५ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ११.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे २८.४ (१२.०), जळगाव २८.४ (१३.३), कोल्हापूर २७.९ (१७.२), महाबळेश्वर २४.६ (१३.३), नाशिक २७.१ (१२.५), निफाड २९.२ (११.६), सांगली २७.९ (१५.८), सातारा २८.७ (१३.५), सोलापूर ३०.३(१६.६), सांताक्रूझ ३३.३ (१९.४), डहाणू ३३.९ (१९.३), रत्नागिरी ३३.० (२०.१),
छत्रपती संभाजीनगर २७.० (१३.४), नांदेड – (१४.२), परभणी २४.७ (१३.६), अकोला २९.७ (१४.४), अमरावती २७.६ (१४.३), बुलढाणा २८.० (१३.५), ब्रह्मपूरी ३१.४ (१३.६), चंद्रपूर २७.६(१२.२), गडचिरोली २९.० (१२.६), गोंदिया २७.१ (१२.४), नागपूर २८.९(१२.१), वर्धा २८.५(१३.०), वाशीम २९.८ (१२.६), यवतमाळ २९.० (११.५).
दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाचा अंदाज
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंके जवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. यातच राज्याच्या दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १७) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.
विजांसह पावसाची शक्यता :
रत्नागिरी, सांताक्रुझ, सातारा, कोल्हापूर, सांगली.