उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून राजकारण आणि समाजकारण यांची योग्य ती सांगड घालून गावचा विकास साधला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आणि एक आदर्श निर्माण करणारी ग्रामपंचायत म्हणून आज पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रुप ग्रामपंचायत ओळखली जाते. ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच सुभाषशेठ भोपी,उपसरपंच जयदास चौधरी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या वतीने आणखीन एका नवीन विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला तो म्हणजे माण देशी फाऊंडेशन शाखा कामोठे यांच्या माध्यमातून आणि दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावांतील महिला – भगिंनी करिता शिवणकाम शिकण्याकरिता मोफत शिवणक्लासेसचे प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नारी शक्ती आज प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेतानां दिसत आहेत,गृहिणी म्हणून अनेक भूमिका निभावून दहा अंगाने काम काम करणाऱ्या आधुनिक युगातल्या सावित्रीच्या लेकींनीं आपल्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहून स्वाभिमानाने समाजात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं या करिता आणि त्यांच्या करिता रोजगाराच्या नवं – नवीन संधी निर्माण व्हाव्यात व त्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळावा या करिता त्यांना त्या त्या क्षेत्रातलं योग्य ते प्रशिक्षण मिळावं आणि त्यांच कलाकौशल्यातून हाताला रोजगार मिळावा ह्याच उदात्त भावनेतून दुंदरे ग्रुपग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या ह्या शिवणकाम क्लासेस प्रशिक्षण शिबिराचे सर्व स्तरांतून आणि खास करून महिलांवर्गातून कौतुक केलं जातं आहे.यामध्ये ग्रामपंचायत हद्दीमधील 200 महीला शिवणक्लास प्रशिक्षण घेणार आहेत.
दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या शिवणकाम क्लासेस प्रशिक्षण शिबिराच्या शुभारंभ कार्यक्रमा करिता माण देवी फाऊंडेशन कामोठे शाखेचे प्रशिक्षक वर्ग, ग्राम विकास अधिकारी,दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य , ग्रामस्थ यांच्या सोबतीने महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला.