सातारा : सातारा जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याचा परिणाम ऊस गळीत हंगामावर दिसून येत आहे. उसाची वाढ खुंटली असून जिल्ह्यासह राज्यातील कारखान्यांमध्ये ऊस गाळप, साखर उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील साखर उत्पादन ८० ते ९० लाख क्विंटलवर येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात घट झाल्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. सातारा जिल्ह्याची दैनंदिन गाळप क्षमता ८२ हजार टन आहे. मात्र, तेवढे दैनंदिन गाळप सध्या सुरू नाही.
काही कारखान्यांचे दैनंदिन गाळपही पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. कमी पावसाने एकरी उत्पादनात घट झाली आहे. दरवर्षी हंगाम १०० ते १२० दिवस चालतो. मात्र, कार्यक्षेत्रात उसाची कमतरता असल्याने गाळप पूर्ण करण्यासाठी उसाची पळवापळी सुरू आहे.
गळीत हंगाम जेमतेम ९० दिवसच चालेल. दरवर्षी जिल्ह्यात सरासरी १२.५० टक्के साखर उतारा निघतो. मात्र, यंदा तो ११ च्या पुढे गेलेला नाही. बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती केली जात असली, तरी सरासरी उतारा हा कमीच राहिला आहे.