पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन
सोनेवाडी (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांना पाणी मिळावे म्हणून सात नंबर फार्म भरलेले आहे मात्र सात नंबर चारीमध्ये उगलेल्या झुडपे बाभळी व गबाळामुळे पाणी टेल पर्यंत शेतकऱ्यांच्या पिकास देण्यास वणवण करावी लागत आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळण्या अगोदर जर पाटबंधारे विभागाने चाऱ्यांचे दुरूस्तीचे काम केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती केवळ त्यांच्या डीसाळ नियोजनामुळेच शेतकऱ्यांची वणवण होत असल्याने शेतकरी संतापले आहेत.
गोदावरी डाव्या कालव्यातून रब्बीला दोन आवर्तने जाहीर झाल्याने सध्या या परिसरात गहू हरभरा कांदा ऊस व आधी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे. आपल्याला सात नंबर चारीने पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सात नंबर फार्म देखील रीतसर भरलेले आहेत.मात्र या चारीमध्ये झालेले गबाळ व झुडपामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचेल की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सात नंबर फार्म भरले तेव्हा शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना चारी दुरुस्त करण्याचे सांगितले होते मात्र या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले . त्यामुळे आता या चारीने टेल पर्यंत पाणी जाणे मुश्किल झाले आहे. यामुळे या परिसरात पाटपाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सात नंबरचा फार्म भरून जर पाणी मिळाले नाही तर मग न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
जर गोदावरी डाव्या कालव्याचे सात नंबर चारीचे पाणी जर शेतकऱ्यांना मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या रब्बीच्या सर्व पिकांचे नुकसान होणार आहे.जर असे झाल्यास पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची मागची राहिलेली सर्व पाणीपट्टी माफ करावी व सात नंबर फार्म मागणी अर्ज भरूनही पाणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जेऊर पाटोदा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.