नवी दिल्ली : काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिवसावर झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. स्वातंत्र्याआधी भारत ज्या ठिकाणी होता, त्या काळात नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राहुल गांधी म्हणाले. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, त्यामुळे राहुल गांधी संघावर काय बोलतील याबाबत अनेकांचे लक्ष लागले होते. “स्वातंत्र्याआधी महिलांना अधिकार नव्हते, गोरगरिबांना अधिकार नव्हते, स्पृश्य-अस्पृश्य हे भेदभाव होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील हीच विचारधारा आहे. आम्ही ती गोष्ट बदलली आणि आता पुन्हा ते बदलत आहेत. ज्या ठिकाणी आधी भारत होता तिथेच नेण्याचे प्रयत्न होत आहेत,” असं राहुल गांधी म्हणाले.”केवळ दोन-तीन उद्योगपतींकडे पैसा वळवला जात आहे. ज्या समुदायांची संख्या भरपूर आहे त्यांना कुठेही प्रतिनिधित्व मिळत नाही,” असे राहुल गांधींनी म्हटले.
राहुल गांधी पुढे म्हणाले, “देशात विचारधारेची लढाई सुरू आहे, लोकांना वाटतं की ही राजकीय लढाई आहे, सत्तेसाठीची लढाई आहे ती आहे पण या लढाईचा पाया विचारधारेचा आहे. “दोन विचारांची ही लढाई आहे. एनडीए आणि युपीएमध्ये अनेक पक्ष आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपचे एक खासदार मला लोकसभेत भेटले. भाजपचे अनेक खासदार आधी काँग्रेसमध्ये होते, हे पण काँग्रेसमध्ये होते. मला ते लपून भेटले आणि मला लांबून बघूनच ते माझ्याकडे घाबरत घाबरत भेटायला आले. आणि म्हणाले की मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हणालो की तू काँग्रेसमध्ये आहेस काय बोलायचं आहे? त्याच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत होती. मी विचारलं सगळं ठीक तर आहे. तर तो म्हणाला नाही, राहुलजी आता भाजपमध्ये राहून सहन होत नाहीये. मी भाजपमध्ये आहे पण माझ्या हृदयात काँग्रेस आहे.
राहुल गांधी पुढे सांगू लागले, मी म्हणालो तुम्ही खासदार आहात, तुमचं मन तिथे का रमत नाहीये? तर म्हणाला की, राहुलजी भाजपमध्ये गुलामी करावी लागते. वरिष्ठ जे सांगतात ते कसलाही विचार न करता ऐकावं लागतं, करावं लागतं आमचं कुणीही ऐकत नाही. वरून आदेश येतो म्हणजे आधी ज्या पद्धतीने राजा आदेश द्यायचा त्याच पद्धतीने भाजपमध्ये काम करावं लागतं. तिथे तुमच्या आवडण्या न आवडण्याचा प्रश्न नसतो.”