स्कोडा गाडी पुलावरून खाली कोसळली ; तरुण उद्योजक जयवंत शिंदे गंभीर जखमी 

0

संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून जात असणारी स्कोडा गाडी रस्त्यात असणाऱ्या मोठ्या खड्ड्यात जावुन आढळली. आणि त्यानंतर ही गाडी थेट पुलावरून खाली कोसळून जवळच्या शेतात जाऊन थांबली. या भीषण अपघातात तालुक्यातील ओझर खुर्द येथील तरुण उद्योजक जयवंत रवींद्र शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

           राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपराव शिंदे  यांचा तालुक्यातील कोकणगाव शिवारात दूध प्लांट आहे. या दूध प्लांट वरून रविवारी रात्री दूध घेऊन निघालेली दुधाची गाडी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या हिवरगाव पावसा टोल नाक्याच्या दक्षिणेला काही अंतरावर थांबली होती. या गाडीवर असणाऱ्या लोकांना पैशाची गरज असल्याने दिलीपराव शिंदे यांचे पुतणे जयवंत रवींद्र शिंदे हे संगमनेर येथून  एकटेच आपल्या स्कोडा गाडीतून दुधाच्या गाडीवर असणाऱ्या लोकांना पैसे देण्यासाठी गेले होते. पैसे दिल्यावर तेथून ते पुन्हा माघारी आपल्या स्कोडा गाडीतून संगमनेरकडे येत असताना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खांडगाव पुलाच्या  पाठीमागे असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्यांची स्कोडा गाडी आढळली आणि त्यानंतर ही गाडी थेट पुलावरून खाली कोसळून एका शेतात जाऊन थांबली. या अपघातानंतर जखमी झालेल्या जयवंत शिंदे यांनी टोलनाका प्रशासनाला व रुग्णवाहिकेला स्वतः फोन करत अपघाताची माहिती दिली. मात्र तब्बल चार तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या तरुण उद्योजकाला उपचाराविना अपघातस्थळीच पडून राहावे लागले आणि डोक्याला जास्त मार लागलेला असल्याने ते बेशुद्ध झाले. यावेळी टोलनाका प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. सोमवारी सकाळी काही नागरिकांच्या  अपघाताची ही बाब लक्षात आल्यानंतर जखमी असणाऱ्या जयवंत शिंदे यांना स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त स्कोडा गाडीतून बाहेर काढले. यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गंभीर जखमी असलेले जयवंत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपराव शिंदे यांचे पुतणे तर प्रगतशील शेतकरी तथा ओझर खुर्दचे माजी सरपंच रवींद्र शिंदे यांचे एकुलते एक चिरंजीव आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here