कोपरगाव: के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी व नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन दुय्यम निबंधक (Sub Registrar Grade 1) पदावर आपले नाव कोरणारी कु.निलिमा बाळकृष्ण नानकर हिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने हे यश संपादन करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला.
तिने मिळविलेल्या या अद्भुतपूर्व यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, प्रो.(डॉ) के.एल.गिरमकर, प्रो.(डॉ) विजय ठाणगे, प्रो.(डॉ.) संतोष पगारे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. वासुदेव साळुंके यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. या कार्यक्रमाप्रसंगी कु. नीलिमा हिने उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मला या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. माझा अधिकारी होण्याचा प्रवास याच महाविद्यालयात झाला व महाविद्यालयाने मला सर्वोतोपरी सहकार्य केले. अत्यंत गरीब कुटुंबातून शिक्षण घेत असताना हे महाविद्यालय व येथील प्राध्यापक ठामपणे माझ्या मागे उभे राहिले. यशाचा हा प्रवास अत्यंत खडतर होता परंतु मी कधीही आर्थिक परिस्थितीला माझ्या शिक्षणामध्ये व करियर मध्ये हस्तक्षेप करू दिला नाही. या महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना वाणिज्य विभागाचे माझे मार्गदर्शक प्रा. डॉ. रवींद्र जाधव यांनी मला काळाची गरज ओळखून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा अनमोल सल्ला दिला. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अत्यंत नियोजनपूर्वक स्व:अभ्यास केला व ही परीक्षा उत्तीर्ण केली. माझ्या या यशस्वी वाटचालीत परीवाराबरोबरच महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे शिक्षक प्रो. संतोष पगारे, प्रो. संजय अरगडे, प्रा.रवींद्र जाधव यांच्यासह सर्वांनी सहकार्य केले.
यावेळी तिने कष्ट करण्याची तयारी ठेऊन आत्मविश्वासाने अभ्यास केल्यास यश नक्की मिळते असा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला. सत्काराप्रसंगी संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना महाविद्यालयातील अद्ययावत स्पर्धा परीक्षा विभागाचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उपयोग करून यश संपादन करावे असा संदेश दिला.या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब गायकवाड, प्रा. डॉ. नीता शिंदे, प्रा. मंजुषा सोनवणे, प्रा. सुनिता बालवे यांच्यासह वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.