सातारा/अनिल वीर : रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्यावतीने अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता व संभाषण कौशल्ये या विषयावर एक दिवसीय कार्यकाळ नुकतीच संपन्न झाली.
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखेच्या उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख प्रो. डॉ. सुनिता घार्गे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. जयश्री आफळे व प्रा.लतिका पाटील यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या डॉ. मनिषा पाटील यांनी संभाषण कौशल्ये या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आजच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास आवश्यक असून संभाषण कौशल्ये सर्वच क्षेत्रात उपयुक्त ठरतात.” कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रा. दिपाली घाडगे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, त्याचे होणारे फायदे आणि तमाम मानवी जीवनसमोर निर्माण झालेली आव्हाने याचा उहापोह त्यांनी विवेचनात केला.
प्रास्ताविक प्रो. डॉ. सुनिता घार्गे यांनी केले. आभार डॉ. जयश्री आफळे यांनी मानले. प्रा. लतिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले.