कोरेगाव : फलटण येथील सदगुरु उद्योग समूह आणि अधिनस्त संस्थांच्यावतीने कोरेगाव शहरातील शिवतिर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे अपूर्व उत्साहात राष्ट्रमाता- राजमाता जिजाऊ महोत्सव साजरा करण्यात आला.
महिला, युवतींसह विद्यार्थीनींची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या गौरवास्पद कामगिरीने शहराचे नाव उज्ज्वल करणार्या महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिजाऊ वंदनेनंतर आयोजक सी. आर. बर्गे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिजाऊ महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका त्यांनी विषद केली. नऊ विद्यार्थींनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहर आणि परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवतिर्थ हुतात्मा स्मारक- जुना मोटार स्टँड-रामलिंग रस्ता-नगरपंचायत कार्यालय-बाजारपेठ मैदान-आझाद चौक तेथे परत शिवतिर्थ अशी ही मिरवणूक काढण्यात आली.
काडसिध्द कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. प्रियाताई शिंदे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे यांच्यासह मान्यवर महिलांच्याहस्ते वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या गौरवास्पद कामगिरीने शहराचे नाव उज्ज्वल करणार्या वंदना हरि फडतरे, जयश्री गजानन बर्गे, संगीता वीरकर, हिमगौरी प्रभाकर बर्गे, मंगला शामराव बर्गे व धनश्री संजय बर्गे या महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास अधिक बर्गे, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, अनिल जाधव, प्रशांत यादव, विक्रम फडतरे, संतोष चिनके, रामभाऊ देवकर, कुमार शिंदे, अश्विनी माने यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.