म्हसवड : म्हसवड शहरात सध्या १२ दिवसांतुन एकवेळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पालिकेकडुन होवु लागल्याने नागरीकांतुन तीव्र संताप व्यक्त होत असुन पालिकेने निदान प्रत्येक गल्ली – बोळात आता पाण्याचे टँकर तरी द्यावेत अशी मागणी म्हसवडकर जनतेतुन होत आहे.
म्हसवड शहरासाठी जिवन प्राधिकरणाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे, मात्र सध्या ही योजनाच कालबाह्य झाली असल्याने तिला अनेक ठिकाणी गळती लागली आहे त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे त्यामुळे शहराला सध्या १२ दिवसांतुन एकवेळ पिण्याचे पाणी पालिका देत आहे. १२ दिवसांतुन एकवेळ पाणी पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य जनतेकडे १२ दिवस पाणी साठवुन ठेवण्याची क्षमता नसल्याने त्यांचे अक्षरशा पाण्यासाठी हाल सुरु आहेत. या सामान्य जनतेकडे पाण्याचे टँकर विकत घेण्याची क्षमता नसल्याने पाण्यावाचुन सर्वसामान्य जनतेचे सर्वाधिक हाल सुरु आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती समाधान कारक आहे अशी जनता सध्या पिण्याच्या पाण्याचे टँकर विकत घेत आहेत त्यांच्याकडे पाणी साठवण क्षमता आहे, मात्र सर्वसामान्यांचे काय असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
म्हसवड शहरात नगरपरिषद आहे. शहरातील प्रत्येक नागरीकांना सोयी सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे, असे असताना मात्र पालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप सामान्य जनतेकडुन होत आहे, त्यामुळेच शहरावर भिषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. म्हसवडकर जनतेचे पाण्यासाठी सुरु असलेले हाल मात्र कोणत्याच राजकिय पुढार्यांना व पालिका प्रशासनाला दिसत नसल्याची खदखद व्यक्त होत आहे, विशेषत: महिलावर्गातुन तर अक्षरशा या दोघांनाही शिव्यांची लाखोली वाहीली जात आहे. तरी ही पुढ्यार्यांनी याबाबत मौनीबाबाचे तर प्रशासनाने गांधारीचे रुप घेतल्याने नागरीकांच्या संतापात अधिक भर पडत आहे. नागरीकांतुन वाढलेला संताप हा कोणत्यातरी अनुसूचित प्रकारातुन व्यक्त होण्यापुर्वी पालिका प्रशासनाने याबाबत गंभीरतेने त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी म्हसवडकर जनतेतुन होत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करणार – माजी नगराध्यक्ष नितीन दोशी
सध्या म्हसवडकर जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरु आहेत, पाणी हेच जिवन आहे, मात्र जिवन जगताना पाणी नसेल तर काय हाल होतात, हेच हाल सध्या म्हसवडकर जनता अनुभवीत आहे. सर्वांनाच टँकर घेणे परवडत नाही त्यामुळे सामान्य जनतेला पाणी देण्याची नैतिक जबाबदारी ही पालिकेची आहे, जर पालिका प्रशासनाने ही गंभीर बनलेली समस्या तात्काळ सोडवली नाही तर पालिका विरोधात पालिका कार्यालयासमोर आपण सामान्य जनतेला सोबत घेवुन मोठे जन आंदोलन करणार असल्याचा इशारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी दिला आहे.
२२ जानेवारी रोजी शहरातील मांस विक्रीची व दारुची दुकाने बंद ठेवावीत – दोशी
सोमवार दि. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा धार्मिक विधिवत कार्यक्रमानुसार होत असुन यानिमीत्त देशभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे,म्हसवड शहरातही मोठा उत्सव सोहळा यानिमीत्ताने साजरा होत आहे, त्यामुळे या दिवशी म्हसवड शहरातील सर्व मांस व चिकन विक्रीची दुकाने, दारुची दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी पालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी म्हसवड पोलीस स्टेशन कडे केली आहे.