महाराष्ट्राच्या किशोरांचे ११ वे तर किशोरींचे १६ वे अजिंक्यपद
फलटण प्रतिनिधी. श्रीकृष्ण सातव
फलटण येथे आयोजित ३२ व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात आज पुन्हा एकदा इतिहास रचला. लागोपाठ दोन वर्षात महाराष्ट्राने दुहेरी मुकुट मिळवला आहे. गेल्या वर्षी उना, हिमाचल प्रदेश येथील इंदिरा गांधी स्टेडीयमवर सुध्दा इतिहास रचत महाराष्ट्राने सहव्यांदा दुहेरी मुकुट मिळवला होता. गतवर्षी महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर तर किशोरींनी पंजाबवर विजय मिळवला होता. काल ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेची सांगता झाली. महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी दोन्ही संघानी डावाने विजय मिळविण्याची घोडदौड कायम राखत किशोर-किशोरी गटाच्या ३२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. या स्पर्धेच्या अंतीम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी व किशोरींनी कर्नाटक वर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवले. किशोर गटाने आतापर्यंत ११ वेळा तर किशोरीने गटाने १६ वेळा विजेतेपद पटकाविली आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार राज जाधवला तर ईला पुरस्कार धनश्री कंक ला देऊन गौरवण्यात आले. किशोरांचे प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे आणि किशोरींचे प्रशिक्षक अमित परब यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे
भारतीय खो खो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव व महाराष्ट्र खो खो असो.चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्राने सलग दुसर्यांदा मिळवलेल्या दुहेरी मुकूटाबद्दल व विजयाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचे अभिनंदन केल आहे.