पुणे /हडपसर प्रतिनिधी :
एस. एम. जोशी महाविद्यालयातील मराठी विभाग, एम. जे. एम. सी. विभाग व सुरेशभट गझलमंच यांच्या संयुक्त विद्यमाने दर्जेदार मराठी गझल मुशायरा घेण्यात आला. यावेळी प्रमुख गझलकार म्हणून सुरेश भट गझल मंचचे अध्यक्ष शाहीर सुरेशकुमार वैराळकर म्हणाले की, ज्या व्यक्तिच्या मनात प्रेमभावना प्रज्वलित आह़े. अशीच माणसे गझल व काव्याची निर्माण करू शकतात. काव्याची निर्मिती करणारा कवी हा चीरतरुण राहतो. त्यामुळे आजच्या नव तरुणांनी काव्याची निर्मिती करावी. असे मत सुप्रसिद्ध शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी व्यक्त केले.
सुरेश भट गझल मंचामधील नवोदित गझलकार शौनक कुलकर्णी, सारंग पाम्पटवार, सांची कांबळे, सुशांत सुरसाळे, अमित वाघ (अज्ञातवासी) यांनी प्रेमविषयक आणि सामाजिक आशयाच्या गझल सादर केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.किशोर काकडे म्हणाले की, कवी हा संवेदनशील मनाचा असतो. त्यामुळे माणसाच्या मनातील भावना तो काव्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. आजूबाजूच्या समाजाचे चित्रण काव्यामधून करून समाजाला जागृत करण्याचे कार्य कवी करीत असतो. असे मत प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कवितेच्या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने घेतलेल्या काव्यवाचन आणि निबंधलेखन स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा.किसन पठाडे, प्रा.अजित जाधव, प्रा.दत्ता वसावे, प्रा.विशाखा धोंडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.अतुल चौरे यांनी तर पाहुण्यांचा परीचय प्रा.शुभम तांगडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा.धीरेंद्र गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.धनाजी भिसे, प्रा.अविनाश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.