माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांचे उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांना निवेदन
सातारा /प्रतिनिधी-
परळी, ता. सातारा येथील वन परिमंडल कार्यालयातील स्फोट प्रकरणी दोषी अधिकारी कर्मचारी यांचेवर शिस्तभंग व निलंबनाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.
जिल्हा उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांना याबाबतचे लेखी निवेदन श्री तीकुंडे यांनी दिले असून त्यातील मजकूर असा, परळी, ता. सातारा येथील वन परिमंडल कार्यालयात दि. १४/०३/२०२४ रोजी पहाटेच्या वेळी गावठी हातबॉम्बचा स्फोट होऊन संबंधित कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असून भरवस्तीत झालेल्या स्फोटाच्या प्रकाराने परिसरातील राहीवासी भयभित झाले आहेत. संबंधित हातबॉम्ब वन विभागाने यापूर्वीच्या एका कारवाईदाखल जप्त केले होते. मात्र ताब्यात घेतलेले गावठी हातबॉम्ब वनविभागाच्याच कार्यालयात ठेवण्याचा पराक्रम संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी केलेला आहे, यावरून संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. भविष्यातही अश्या कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्यांचे व निसर्गाचे नुकसान होण्याचे नाकारता येत नाही.
परळी येथे वन परिमंडल कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील वनविभागाच्या कामकाजाचे नियंत्रण करण्यात येते. मात्र काही वर्षांपूर्वी फिरस्ती समाजातल्या काही व्यक्तींकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या व या कार्यालयात ठेवलेल्या हातबॉम्बचा नुकताच अचानक स्फोट झाला, त्यात या कार्यालयाची पडझड झाली. तसेच छप्पराचे पत्रेही उडून गेले. याशिवाय कार्यालयाच्या दारे व खिडक्यांचेही नुकसान झाले असून भिंतीलाही तडे गेले आहेत. स्फोटाचा हा प्रकार लक्षात आल्यावर भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपाल सोलंकी व वनरक्षक काकडे यांना फोन करून हा प्रकार सांगितला. मात्र तातडीने ग्रामस्थांनी कळवूनही संबंधित अधिकारी बऱ्याचशा विलंबाने घटनास्थळी पोहोचले. वास्तविक काही वर्षांपूर्वी जप्त केलेली स्फोटके शासकीय
कार्यालयात ठेवण्याचा पराक्रम संबंधित अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केला, खरे तर जप्त केलेली हातबॉम्बसारखी स्फोटक वस्तू पोलीस व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निष्क्रिय करायला हवी होती, मात्र कोणती तरी मोठी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा करीत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या बेजबाबदारपणाचे प्रदर्शन करत ते हातबॉम्ब कार्यालयात ठेवले. संबंधित स्फोटक वस्तू शासकीय कार्यालयात ठेवण्यासाठी त्यांना वरिष्ठांनी परवानगी दिली होती काय ? याबाबत संबंधितांना विचारणा व्हावी. दाटीवाटीच्या मानवी वस्ती असलेल्या गावच्या मध्यवस्तीतील कार्यालयात झालेला हा प्रकार मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकला असता, असेही या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान नियुक्तीच्या गावी मुक्काम करणे बंधनकारक असताना या विभागाचे वनपाल सोलंकी व वनरक्षक काकडे हे दोघेही परळीमध्ये न राहता सातारा येथून येऊन – जाऊन नोकरी करतात. अधिक माहिती घेता संबंधित दोन्ही कर्मचारी त्यांच्या वेतनातून घरभाडे भत्ता घेत असल्याचे निष्पन्न होत आहे. तर घरभाडे भत्ता घेऊनसुद्धा नियुक्तीच्या गावी न राहता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ही त्यांच्यावर कारवाई व्हावी.
कायद्यानुसार स्फोटजन्य वस्तू मानवी वस्तीमध्ये ठेवू नये, असा नियम आहे. कोणतीही स्फोटक वस्तू मानवी वस्ती पासून दूर ठेवून त्याला लोखंडी तारेचे कंपाउंड करून त्यावर नियंत्रण व संरक्षण देण्याचे काम वन विभागाने केले नाही. जिल्ह्यातील बाराही रेंजमध्ये जिथे कुठे शिकारीसाठी स्फोटक पदार्थ वापरले जातात. स्फोटक पदार्थ वनविभागाने ताब्यात घेतले असतील तर त्याबाबतची माहिती वनविभागाच्या वरिष्ठांनी लोकहितार्थ प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. मात्र वन विभागाने कमालीचा निष्काळजीपणा दाखवून नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे वनपाल सोलंकी व वनरक्षक काकडे यांचेवर कर्तव्यात कसूर करणे, नोकरीच्या ठिकाणी मुक्कामी न राहणे व शासनाकडून घर भाडे भत्ता घेणे, शासनाची फसवणूक करणे, सर्वसामान्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसानीस जबाबदार राहणे, धोका कळूनही वेळेत न पोहोचणे, कामातील निष्काळजीपणा आदी बाबींचा ठपका ठेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांचेवर शिस्तभंग व निलंबनाची कायदेशीर कारवाई करणेत यावी, अशी मागणी ही तिकुंडे यांनी केली असून या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव, महसूल आणि वन विभाग यांचे प्रधान सचिव, पुण्याचेविभागीय आयुक्तसो, प्रधान मुख्य वनसंरक्षक आदींना दिल्या आहेत.