संघटनेवर डाव्या आणि आंबेडकरी संघटनांचं वर्चस्व
नवी दिल्ली : JNUSU अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीची चर्चा देशभरात होत असते. एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, सीताराम येचुरी, प्रकाश करात यासारखे नेते कधी जेएनयूमध्येच शिकले होते. अलीकडील काळातील कन्हैय्या कुमार, कविता कृष्णन देखील जेएनयूमधून शिकून पुढे राजकारणात आल्याचं आपण पाहिलं आहे. अनेक जणांनी आपल्या विद्यार्थीदशेत या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला होता आणि पुढे ते राष्ट्रीय राजकारणात आलेले देखील पाहायला मिळाले. काही जण या निवडणुकांपासून दूर राहिले पण नंतर पुढे ते राजकारणात आले आणि आपल्या नेतृत्वाची पायाभरणी जेएनयूमध्ये असतानाच झाली असं ते आवर्जून सांगतात. त्यामुळे यावेळी जेएनयूच्या निवडणुकीत काय होईल याकडे साऱ्यांचे लक्ष होतं. याचं आणखी एक कारण म्हणजे यावेळी चार वर्षांच्या अवकाशानंतर या निवडणुका झाल्या.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये डाव्या विचारसरणीच्या गटाच्या संघटनांचा विजय झाला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना हरवत डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुंडट्स असोसिएशन (AISA) चा उमेदवार JNUSU म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आला आहे. पुन्हा एकदा विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडे गेल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी सर्व डाव्या संघटनांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती.
निवडणूक समितीचे प्रमुख शैलेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी धनंजय, उपाध्यक्ष पदावर अविजीत घोष, सरचिटणीस पदावर प्रियांशी आर्या आणि संयुक्त सचिवपदी मोहम्मद साजिद हे विजयी झाले आहेत. AISA च्या धनंजय कुमारने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या उमेश चंद्र अजमीराला हरवले. धनंजय कुमारला 2598 मतं तर उमेश चंद्रला 1676 मतं पडली. उपाध्यक्षपदी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा (SFI) अविजीत घोष विजयी झाला. त्याला 2409 मतं मिळाली, तर अभाविपच्या दीपिका शर्माला 1482 मतं मिळाली. सरचिटणीसपदासाठी झालेल्या निवडणुकीत बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशनची( BAPSA) प्रियांशी आर्या विजयी झाली. तिला 2887 मतं मिळाली तर अभाविपच्या अर्जुन आनंदला 1961 मतं मिळाली.
या पदासाठी आधी स्वातीला उमेदवार बनवण्यात आलं होतं. परंतु मतदानापूर्वी तिचं नामांकन रद्द करण्यात आलं. त्यानंतर BAPSA च्या प्रियांशी आर्याला समर्थन देण्यात आलं आणि ती निवडून आली.या व्यतिरिक्त ऑल इंडिया स्टुंडंट्स फेडरेशनचा (AISF) मोहम्मद साजिद संयुक्त सचिव म्हणून निवडून आला आहे. मोहम्मद साजिदला 2574 मतं मिळाली, तर अभाविपच्या गोविंद दांगीला 2066 मतं मिळाली होती. जेएनयूमध्ये शेवटची निवडणूक 2019-20 मध्ये झाली होती. त्यात डाव्या संघटनांचाच विजय झाला होता.