संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

0

कोपरगाव: (प्रतिनिधी)- संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव चैतन्यमय व आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांना शाळेची गोडी लागावी व भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गामध्ये ठेऊन वर्गाच्या भिंती देखील आकर्षकपणे सजविण्यात आल्या होत्या.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करीत वाजत गाजत पुष्पगुच्छ व आकर्षक वेलकम बोर्ड हातात देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळेच्या परिसरात विविध रंगांनी भरलेली रांगोळी काढण्यात आली, फुग्यांची आरास करण्यात आली, सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला व तसेच कार्टूनचे कट आऊट्स लावण्यात आले. तर बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने आई-वडिलांसोबत आलेले चिमुकले काहीसे कावरे-बावरे होत त्यांनी शाळेची वाट धरली तर काही आई-वडिलांना मिठी मारून रडताना दिसून आले. शाळेचे क्लासरूम आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. विविध फुलांनी, चित्रांनी फुग्यांनी व सजवलेली शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या आकाराची व रंगाची दप्तरं घातलेली मुलं आई बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली तर काही हिरमुसलेल्या चेहऱ्याने गप्प उभी असलेली मुले शाळेत दिसून आली तर काही कुतूहल्याने बघत असलेली हसत खेळत असलेली मुले, रडणाऱ्या मुलांना समजावत असलेले शिक्षक असे दृश्य शाळेच्या पहिल्या दिवशी बघायला मिळाले.

शाळेत राबवत असलेले कृतियुक्त शिक्षण,वेळेचे योग्य नियोजन व उत्कृष्ट निकालाची परांपरा यामुळे शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच पालकांच्या हस्ते शाळेच्या वतीने विद्येची देवता माता सरस्वतीचे व संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी शाळेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे,मुख्याध्यापक सचिन मोरे, उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here