आम्ही आपल्या भानगडी बाहेर काढल्या तर सार्वजनिक जीवनात तुम्हाला तोंड दाखवणे अवघड होईल

0

जावळी : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत आमचा मोठा वाटा आहे. आपल्या वडिलांच्या व आजोबांच्या सहकार्यामुळे ही संस्था शेतकऱ्यांसाठी उभी राहिली. या सहकार्याची जाणीव न ठेवता आमच्यावर बेछूट आरोप करू नयेत.
आम्ही आपल्या भानगडी बाहेर काढल्या तर सार्वजनिक जीवनात तुम्हाला तोंड दाखवणे अवघड होईल, असा इशारा जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांना येथील पत्रकर परिषदेत दिला.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सौरभ शिंदे यांनी सायगाव येथील सभेत सदाशिव सपकाळ यांच्यावर प्रतापगड कारखान्याची उभारणी झाली आता यांना काय हवे आहे तसेच त्यांना सातत्याने हँगओव्हर होत असावा, अशी शेटीका केली होती. या टीकेला सदाशिव सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी हणमंतराव चवरे उपस्थित होते. सपकाळ म्हणाले, कुडाळच्या कॅडबरी बॉयने आपल्या बालबुध्दी अकलेचे तारे तोडले. प्रतापगड कारखान्याच्या उभारणीमध्ये आपले वडील व माझे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कॅडबरी बॉयच्या बालिश बुद्धीची दखल घेणार नव्हतो. मात्र, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावू नये म्हणून वस्तूस्थिती मांडत आहे. प्रतापगड कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही उभा केला होता.

आमच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी राज्य सरकारची हमी दिली होती. या उभारणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचाही मोठा वाटा आहे . मी शिवसेनेचा आमदार असलो तरी संचालक मंडळ लालसिंगराव शिंदे आणि त्यांच्या विचारांचे होते. 1999 ते 2004 या दरम्यान प्रतापगड कारखाना बँकांचे सरकारी व्याज जास्त झाल्यामुळे बंद होता. असे असताना कुडाळच्या कॅडबरी बॉयने ही सर्व वस्तुस्थिती समजून घ्यावी. कारखाना बंद राहिल्याने शेतकऱ्यांसाठी आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवारांच्या सूचनेप्रमाणे आम्ही कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली तसेच जावळी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी ग्लुकोज कारखान्याची आम्ही उभारणी केली. मात्र, राज्य सरकारच्या विरोधामुळे त्यात यश आले नाही.

संबंधित शेतकऱ्यांना आम्ही या प्रकल्पाचे पैसे व्याजासह देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही वस्तुस्थिती असताना कुडाळच्या कॅडबरी बॉयने आमच्या नादाला लागू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही आमदारकीच्या कार्यकाळात महू हातगेघर धरण सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. मला कमजोर समजण्याची चूक करू नका, जनता नाराज आहेच. फक्त मी एक ठिणगी टाकली तर तुमची राख रांगोळी करायची ताकद माझ्यात आहे, असा इशारा सदाभाऊ सपकाळ यांनी दिला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here